Sun, Aug 25, 2019 07:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या पूर्वेला साकारणार ‘मियामी’ सिटी

मुंबईच्या पूर्वेला साकारणार ‘मियामी’ सिटी

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी

लगेज ट्रॉली घेऊन येणारे-जाणारे हसतमुख प्रवासी, हसतमुखाने स्वागत होणारे इमिग्रेशन काऊंटर्स, तसेच जकातमुक्त दुकाने हे चित्र सर्वसामान्यपणे विमानतळावर पाहायला मिळते. परंतु, आता मुंबई पोर्ट ट्रस्टने दुर्लक्षित राहिलेल्या अरबी समुद्राच्या पूर्व किनार्‍याचा अत्याधुनिक सोयींनी युक्त असा विकास हाती घेतल्याने मियामी शहराच्या धर्तीवर हे चित्र इथेही पाहायला मिळणार आहे.  इंटरनॅशनल कू्रझ टर्मिनलने त्याची पायाभरणी केली असून फेब्रुवारीच्या अखेरीस मुंबईतून गोव्यासाठी पहिले अलिशान प्रवासी जहाज सुटेल. 

अरबी समुद्राच्या पूर्व किनारपट्टीचा मोठा भाग बीपीटीने व्यापला  आहे. त्यापैकी 11 किमी भागात बीपीटीला अत्याधुनिक सुविधांचे जाळे उभे करायचे आहे. बीपीटीकडून त्याची सुरुवात केव्हाच झाली असून बॅलॉर्ड इस्टेटच्या पाठीमागच्या जागेत इंटरनॅशनल कू्रझ टर्मिनलसारख्या अत्याधुनिक वाहतुकीच्या सुविधाही उभ्या राहिल्या आहेत. त्याचाच भाग असलेला ‘स्टायलिश मरिना’ लवकरच उभे राहणार आहे. विद्यमान जेट्टीचे नवीन डिझाईननुसार आधुनिकीकरण सुरू असून, या जेट्टीवरूनच मांडवा, नवी मुंबई आदी ठिकाणी जलवाहतूक सुरू होईल. 

काही महिन्यांतच येथे मेरिटाईम म्युझियमही उभे राहणार आहे.एकदा अत्याधुनिक पद्धतीचा विकास आला, की त्याच्याबरोबर नवी दृष्टी, नवी दिशा असलेले परिपूर्ण मनुष्यबळही आले. साहजिकच सध्या जे आगत-स्वागताचे चित्र आपण मुंबई विमानतळासारख्या ठिकाणी पाहतो, तेच येथेही पाहायला मिळणार आहे. खानपान, इतर अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त क्रूझ टर्मिनलबरोबरच या परिसराचा कायापालट होणार असल्याने प्रवासी, पर्यटकांना मियामी सिटीसारखाच फील येथेही मिळणार असल्याने हे प्रवासी, पर्यटक, मुंबईकरांचे आकर्षणाचे खास केंद्र ठरणार आहे.    

या किनारपट्टीचा विकास करताना जुन्या वास्तूंचा वापर सर्वांसाठी कसा करता येईल, यावर भर देण्यात येत आहे.  येथे 100 वर्षांपूर्वीचा दगडी वॉचटॉवर आहे. त्याचा वापर समुद्रलाटांची उंची मोजण्यासाठी, सागरी अभ्यास करण्यासाठी होतो. हा टॉवर आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार असून, वाडीबंदर परिसरात असलेला जुना कास्ट आयर्न कॅरेजवे, तोफा, टेलिफोन बुथ्स हे देशांतर्गत क्रूझ टर्मिनलच्या परिसरात आणून ते म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहेत. सर्वच मुंबईकर क्रूझमधून प्रवास करतील, असे नाही. परंतु, अशा मुंबईकरांसाठी येथे निर्माण करण्यात येणार्‍या अत्याधुनिक सुविधा मोठे आकर्षण असेल, या दृष्टीने विकासावर भर देण्यात येत आहे.