Mon, Mar 25, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ईव्हीएम मशीन जाणीवपूर्वक बंद

ईव्हीएम मशीन जाणीवपूर्वक बंद

Published On: May 29 2018 2:14AM | Last Updated: May 29 2018 1:48AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानावेळी वोटिंग मशिनमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या बिघाडावर विरोधकांनी संशय व्यक्त केला असून जाणीवपूर्वक मशीन बंद पाडण्यात आल्याचा आरोप केला. ज्या मतदान केंद्रांमध्ये वोटिंग मशिनमध्ये बिघाड झाला तेथे फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली असून व्ही. व्ही. पॅट स्लीपचीही मोजणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भंडारा — गोंदियात जाणीवपूर्वक मशीन बंद पाडल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने मात्र तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद पडले तरी ते तातडीने बदलण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याचे स्पष्ट केले. 

खा. अशोक चव्हाण म्हणाले, जवळपास 25 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान यंत्रामध्ये बिघाड होणे संशयास्पद आहे. उन्हामुळे व तापमानामुळे मतदान यंत्रे खराब होतात हे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही. देशात यापूर्वी ही अनेकदा उन्हाळ्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दोन आठवड्यापूर्वीच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकाही कडक उन्हाळ्यात मे महिन्यामध्येच पार पडल्या होत्या. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानयंत्रामध्ये बिघाड झाला नव्हता. या मशीन गुजरातमधून आणल्याची माहिती मिळते आहे, त्यामुळे संशयात अधिक भर पडत आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र, दुर्देवाने तसे होताना दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनीही मशिनमधील बिघाडाबाबत संशय व्यक्त केला.  पालघर,भंडारा-गोंदियामध्ये मशीनचा गैरवापर करून सरकारने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. उत्तर प्रदेशच्या गैरानामध्येसुध्दा 300 मतदान केंद्रावर मतदान होवू शकले नाही. भंडारा — गोंंदियामध्ये 25 टक्के मतदान केंद्रावर मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले. पालघरमध्येसुध्दा तीच परिस्थिती झाली. 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की, साम दाम दंड भेद वापरून निवडणूक जिंकू, त्याप्रमाणे मशीन सुरतहून आणण्यात आल्या आहेत. भाजप नियोजनबध्द पध्दतीने मशीनचा वापर करत आहे, असा आरोप त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी तर भंडारा — गोंदियात सुमारे चारशे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे सांगत जाणीवपूर्वक मशीन बंद पाडण्यात आल्याचा आरोप केला.