Wed, May 22, 2019 11:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात पुन्हा ईडीचे छापे

ठाण्यात पुन्हा ईडीचे छापे

Published On: Feb 20 2018 1:42AM | Last Updated: Feb 20 2018 1:42AMठाणे : प्रतिनिधी

 पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी रात्री ईडीच्या पथकाने ठाण्यातील जिली व गीतांजली हिरे ज्वेलरी शॉपमध्ये छापे मारून पडताळणी सुरु केली होती. या दोन्ही शोरूममधील सील केलेला करोडोंचा ऐवज जप्त करण्याची कारवाई सोमवारी ईडीच्या पथकाने केली. तसेच ठाण्यातील तलावपाळी, गोखले रोड व हिरानंदानी मेडोजमध्ये असलेल्या राजवंत ज्वेलर्स या शॉपवर देखील ईडीच्या पथकाने सोमवारी दिवसभर छापेमारी करून करोडोंचा ऐवज जप्त केला. ही जप्तीची कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.

सध्या गाजत असलेल्या साडेअकरा हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने ठाण्यातील विवियाना मॉलच्या तळ मजल्यावरील जिली व गीतांजली या दोन दुकानावर छापे मारून पडताळणी सुरु केली होती. हे दोन्ही हिर्‍याचे शोरूम सील करण्यात आल्यानंतर सोमवारी या दोन्ही शोरूम मधील हिरे व इतर ऐवज जप्त करण्याची कारवाई ईडीच्या पथकाकडून सुरु करण्यात आली. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्या प्रकरणी मागील आठवड्यात गुरुवारी रात्री ईडीच्या 6 जणांच्या पथकाने विवियाना मॉलच्या दोन शोरूममध्ये व एका डायमंड विक्री करणार्‍या ज्वेलर्स शॉपमध्ये छापे टाकून येथील एकूण ऐवजांची पडताळणी सुरु केली होती. 

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आरबीआयकडेही बोट!

मुंबई ः पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी बँक असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी आरबीआयच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. हिरे व्यापारी

नीरव मोदी याने त्याच्या व्यावसायिक भागीदारांच्या मदतीने पीएनबीला सुमारे 11 हजार 500 कोटींचा चुना लावल्याचे उघड झाले आहे. पीएनबीच्या कनिष्ठ अधिकार्‍यांसोबत संगनमत करून लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) पदरात पाडून हा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे माजी अध्यक्ष विश्‍वास उटगी यांनी आरबीआयच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. एलओयूबाबत तीन महिन्याला खातरजमा करण्याचे काम आरबीआयचे आहे. आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर यू. व्ही. रेड्डी, डी. सुब्बाराव, रघुराम राजन आणि विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेल एवढा मोठा घोटाळा घडेपर्यंत काय करीत होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या घोटाळ्याला आरबीआयलाही का जबाबदार धरू नये, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 2011 साली नीरव यास एलओयू देण्यात आला. तेव्हापासून आरबीआयने पीएनबीकडे याबाबत खुलासा का मागितला नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.

एसआयटीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्याची विशेष पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील अनेक हायप्रोफाईल आरोपींची बाजू मांडणारे अ‍ॅडव्होकेट विजय अगरवाल हे नीरव मोदीची बाजू मांडणार असल्याचे आज स्पष्ट झाले. 
10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

नवी दिल्ली :

बँकांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी योग्य ती नियमावली असूनही घोटाळा कसा घडला? त्याची माहिती येत्या दहा दिवसांच्या आत सादर केली जावी, असे निर्देश केंद्रीय दक्षता आयोगाने (सीसीव्ही) पंजाब नॅशनल बँक तसेच अर्थमंत्रालयाला दिले आहेत. पीएनबी, रिझर्व्ह बँक तसेच सरकारच्या वित्तसेवा विभागाच्या अधिकार्‍यांनी आज घोटाळ्याबाबत सीव्हीसीसमोर सादरीकरण केले. घोटाळ्याच्या अनुषंगाने सीबीआयच्या अधिकार्‍यांनीदेखील दक्षता आयोगासमोर हजेरी लावली. 

बँकांना शेअर बाजारात 70 हजार कोटींचा फटका;

पीएनबी शेअरच्या किमतीत 28 टक्के घसरणमुंबई : पीएनबीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर भारतीय बँकांचे शेअर बाजारातील भांडवली मूल्य तब्बल 70 हजार कोटी रुपयांनी घटले आहे.  गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजारातील बँकेक्स हा निर्देशांक 28732 वरून घसरून 28113 पर्यंत आला आहे. तब्बल सुमारे 615 अंकांच्या या घसरणीने हे नुकसान झाले आहे. पीएनबीपाठोपाठ रोटोमॅकच्या कंपनीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. काही बँकांच्या शेअरच्या किमती तर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्या. घोटाळा उघडकीस आल्यानंतर पीएनबीच्या शेअरची किंमत 28 टक्क्यांनी उतरली असून भांडवली मूल्यात 10 हजार 976 कोटींची घट झाली आहे. एसबीआयचे मूल्य 18 हजार, तर बँक ऑफ बडोदाचे मूल्य 5634 कोटी रुपयांनी घटले आहे.