Wed, Jan 22, 2020 22:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरेंना ‘ईडी’ची नोटीस; २२ ऑगस्टला चौकशी

राज ठाकरेंना ‘ईडी’ची नोटीस; २२ ऑगस्टला चौकशी

Published On: Aug 19 2019 1:34AM | Last Updated: Aug 19 2019 6:16PM
मुंबई : पुढारी 

विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचाच कालावधी राहिला असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. यशावकाश या प्रकरणाचा उलघडा होईल, पण या नोटीसीमुळे राज्यात घमासान रंगणार हे निश्चित आहे. 

विरोधी पक्षातील नेत्यांना बिथरण्यासाठी तपास यंत्रणांचा खुबीने वापर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेते करत आहेत.कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात राज ठाकरेंची येत्या २२ ऑगस्टला चौकशी होणार आहे. राज ठाकरेंनी सुद्धा दुजोरा दिला आहे. या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेश जोशी यांनाही ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. त्यांची आज (ता.१९) चौकशी करण्यात येत आहे. सायकांळी सहा वाजेपर्यंत त्यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू होती. 

ईडीकडून सरकारी क्षेत्रातील कंपनी असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईतील ‘कोहिनूर सीटीएनएल’ कंपनीला दिलेल्या ८६० कोटी रूपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात तपास सुरू आहे. उन्मेष जोशींच्या मालकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ दादरमधील ‘सेना भवन’ समोर ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती.

राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून८६० कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र या व्यवहारामध्ये आयएलएफएसला मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. आयएलएफएसकडून शेअर विकण्यात आल्यानंतर लगेच २००८ मध्ये राज ठाकरे यांनी यातील आपले सर्व शेअर्स विकले. पण त्यानंतरही राज ठाकरे कंपनीत सक्रिय सहभाग असल्याचा ईडीचा दावा आहे. 

राज यांची चौकशी कशासाठी? 

राज ठाकरे यांनी कोहिनूरमधून अचानक काढता पाय का घेतला या संदर्भात ईडी चौकशी करेल. आयएल अॅण्ड एफएस ग्रुपने या प्रकल्पामध्ये २२५ कोटींची थेट गुंतवणूक केली होती. मात्र कंपनीने २००८ साली आपल्या मालकीचे सर्व शेअर्सचा हक्क अवघ्या ९० कोटींच्या किंमतीवर सोडला. त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी त्याच वर्षी आपल्या मालकीचे शेअर्स विकून कंपनीमधील आपला सहभाग संपुष्टात आणला.