Thu, Jun 27, 2019 13:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसैनिक झालेले मनसे नगरसेवक ‘ईडी’च्या रडारवर

शिवसैनिक झालेले मनसे नगरसेवक ‘ईडी’च्या रडारवर

Published On: Feb 01 2018 2:15AM | Last Updated: Feb 01 2018 1:46AMमुंबई : प्रतिनिधी

मनसेमधून शिवसेनेत दाखल झालेल्या मनसेच्या एका नगरसेवकावर मंगळवारी ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्यानंतर आता, उर्वरित पाच नगरसेवक ‘ईडी’च्या रडारवर असल्याचे समजते. येत्या काही दिवसांत अजून एका नगरसेवकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसेच्या नगरसेवकांना भाजपमध्ये घेऊन मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील होते. मनसेच्या नगरसेवकांसोबत चर्चाही सुरू होती; पण अचानक सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपचे सत्तेचे स्वप्न भंग पावले आहे. मनसे नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी करोडो रुपये देऊन शिवसेनेने नगरसेवकांना विकत घेतल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही, तर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी ‘ईडी’मार्फत या नगरसेवकांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती.

नगरसेवकांचे प्रवेश कायद्याच्या चौकटीत अडकले; पण गेल्याच आठवड्यात सहाही नगरसेवकांच्या शिवसेना विलीनीकरणाची घोषणा महापालिका सभागृहात करण्यात आली. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत शिवसैनिक झालेले घाटकोपरचे नगरसेवक परमेश्‍वर कदम यांच्यावर ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला. यामागे भाजपचेच राजकारण असल्याची चर्चा पालिकेत चर्चा रंगली आहे.

दरम्यान, कदम यांच्यानंतर अन्य पाच नगरसेवकांना बेहिशेबी मालमत्तेमध्ये गुंतवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याचे पुरावेही भाजपच्या हाती लागले आहेत. हे पुरावे ‘ईडी’ला सादर करण्यात आल्याचे समजते. मनसेमधून शिवसेनेत गेलेल्या एका ज्येष्ठ नगरसेवकाचा आर्थिक व्यवहार चित्रपटगृहाच्या मालकासोबत असल्याचे समजते. हाच पुरावा सादर करून त्या नगरसेवकाला बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात अडकवणार असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसात अजून नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अन्य चार नगरसेवकांचेही पुरावे जमा करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.