Fri, Aug 23, 2019 21:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बॉम्बस्फोटाच्या ई-मेलने मुंबईत हाय अ‍ॅलर्ट जारी

बॉम्बस्फोटाच्या ई-मेलने मुंबईत हाय अ‍ॅलर्ट जारी

Published On: Feb 04 2018 2:14AM | Last Updated: Feb 04 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी

अतिरेक्यांच्या कायम टार्गेटवर असलेली  देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरीच्या सुरक्षेची जबाबदारी पेलत असलेल्या मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई विमानतळ आणि हिंदुजा रुग्णालय परिसरात हा बॉम्बस्फोट घडवून आणला जाणार असल्याची माहिती देणारा हा ई-मेल असून याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकीच्या या ई-मेलनंतर शहरात हायअर्लट जारी करण्यात आला असून मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवाद विरोधी विभागाने (एटीएस) ई-मेल पाठविणार्‍या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

अंधेरी येथील सहार विमानतळ आणि हिंदुजा रुग्णालय माहीम येथे बॉम्बस्फोट होणार असून जाहीद खान नावाचा व्यक्ती हा बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा ई-मेल 30 जानेवारीच्या रात्री 8 वाजून 58 मिनिटांनी मुंबई पोलिसांना आला. आतीफ शेख नावाच्या तरुणाने हा ई-मेल केला होता. ई-मेल प्राप्त होताच माहीम आणि सहार पोलिसांनी दोन्ही घटनास्थळी बंदोबस्त वाढवत, एटीएस, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्‍वान पोलिसांच्या मदतीने परिसरात संशयित व्यक्ती आणि वस्तूचा शोध सुरू केला.

31 जानेवारीच्या सकाळी साडेआठच्या सुमारास घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र तपासामध्ये संशयस्पद असे काही आढळले नाही. तसेच ई-मेल पाठविणार्‍या व्यक्तीचा फोनही बंद असल्याने अखेर माहीम पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधात कक्षाचे पोलीस शिपाई प्रवीण सनांसे (30) यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात बॉम्बची अफवा पसरवून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले म्हणून गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते.