Fri, May 24, 2019 03:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कलप केलेल्या केसांना हात लावला म्हणून हत्या 

कलप केलेल्या केसांना हात लावला म्हणून हत्या 

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी

कलप केलेल्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून 23 वर्षी तरुणाने चाकूने सपासप वार करुन 25 वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरात घडली. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे गोवंडीमध्ये एकच खळबळ उडाली आणि पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली. हत्येनंतर मारेकर्‍याचा शोध घेत असलेल्या गुन्हे शाखेने परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना घाटकोपरच्या छेडानगरातून त्याच्या मुसक्या आवळून गुन्ह्याची उकल केली आहे.

गोवंडीच्या बैंगनवाडीत असलेल्या कमला रामण नगरात राहात असलेला मोहम्मद हुसेन शेख (25) हा तरुण नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी घराजवळ उभा होता. चारच्या सुमारास कुमैलरजा सय्यद उर्फ शाहरुख (23) हा तेथे पोहोचला. शाहरुखने डोक्यावरचे केस कलप केले असल्याने उत्सुकतेपोटी हुसेनने विचारणा करत त्याच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न केला. केसाला हात लाऊ नको असे बजावत शाहरुखने हुसेनसोबत वाद घातला. वाद विकोपाला जाताच शाहरुखने रागाच्या भरात हुसेनवर चाकूने हल्ला चढवला. हुसेनच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर आणि पाठीवर सपासप वार करुन शाहरुखने तेथून पळ काढला.

भररस्त्यात करण्यात आलेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हुसेनला कुटूंबियांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. हल्ल्याची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. हुसेनचे वडील अब्दुल (55) यांच्या तक्रारीवरुन गोवंडी पोलिसांनी आरोपी शाहरुख विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला.

हत्याकांडामूळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरत असल्याने गुन्हे शाखा कक्ष सहाचे प्रमुख पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, महेश तोरसकर, पोलीस हवालदार जयवंत सकपाळ आणि काळे, तसेच पोलीस नाईक सावंत, पोलीस शिपाई चौधरी यांच्या पथकाने खबर्‍यांच्या मदतीने आरोपी शाहरुखचा माग काढण्यास सुरुवात केली. हत्येनंतर तो मोटारसायकलने नवी मुंबईला पसार झाल्याची माहिती या पथकांना मिळाली. त्यानुसार शाहरुखचा शोध सुरु असताना तो लोकमान्य टिळक टर्मिनन्सवरुन परराज्यात पसार होणार असल्याचे पोलिसांना समजले.