होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पावसाळ्यात महाड- पोलादपूर मार्गावर अपघाताचे जाळे?

पावसाळ्यात महाड- पोलादपूर मार्गावर अपघाताचे जाळे?

Published On: Jun 10 2018 1:01PM | Last Updated: Jun 10 2018 1:01PMपोलादपूर –प्रतिनिधी 
    
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरचे काम वेगाने सुरु करण्यात आले असले तरी महाड-पोलादपूर या हद्दीतील राजेवाडी फाटा ते लोहारे या मार्गावर ठीक ठिकाणी पाणी साचणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच दोन्ही बाजूंनी मातीचे भराव टाकण्यात आल्याने येत्या पावसात येथील माती पाण्यासह महामार्गावर आल्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाचा ठेका लार्सन ऍण्ड टूब्रो कंपनीला देण्यात आल्यानंतर कामांनी वेग घेतला होता. मात्र या भागात पडणाऱ्या पावसाळ्याचा अंदाज न घेता महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी कामाला सुरवात केल्याने तसेच पाणी जाण्यासाठी रस्त्यालगत चर न ठेवल्याने पावसाच्या दिवसात महामार्गवर पाणी साचणार आहे. तसेच माती पाण्यासह रस्त्यावर आल्यास चिखलाचे साम्राज्य दिसू शकते. मुंबई-गोवा महामार्गाचे महाड ते पोलादपूर हद्दीतील काम करताना असलेल्या साईडपट्ट्या या कामात गायब झाल्याने तसेच रस्त्याची स्थिती दोन्ही बाजूंनी नव्या रस्त्याचे काम त्यावर मातीचा भराव त्यातच मूळ महामार्ग मधोमध राहिल्याने नुकत्याच झालेल्या पावसात ठिक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले तसेच मातीही रस्त्यावर आल्याचे दिसून येत आहे. 

नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्ती  समितीच्या बैठकीमध्ये मुंबई-गोवा  राष्ट्रीय महामार्गावरील  अपघात आणि रस्त्यावर  चिखल होण्याचे प्रकार नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने झाल्यास एलएण्डटी कंपनी इंजिनियर जबाबदार राहतील, असे तहसीलदार शिवाजी जाधव यांनी सांगितले होते. मात्र, एलऍण्डटी कंपनीच्यावतीने  हेमंत मुळे पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या गाड्यांना कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले असले तरी दुचाकीस्वार याचे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

येत्या चार महिन्यात पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे प्रमाण पाहता ठीक ठिकाणी पाणी साचणार असल्याने वाहनांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे तसेच दुचाकीस्वारांना झाडाचा आसरा मिळणार नसला तरी इतर वाहनाचे पाणी अंगावर झेलत प्रवास करावा लागणार आहे.  येत्या चार महिन्यात महामार्गावर एखादी घटना घडल्यास संबधित ठेकेदारांनी आपली यंत्रणा उपलब्ध ठेवणार  असल्याचे समजे याबाबत अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही.