Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चार दिवस घर सोडा : पालिका आयुक्तांचा अजब सल्‍ला

चार दिवस घर सोडा : पालिका आयुक्तांचा अजब सल्‍ला

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 13 2018 1:21AMडोंबिवली : वार्ताहर

एकीकडे शहरातील डम्पिंगला लागणारी आग आणि त्याच्या धुरात कल्याणकर घुसमटत असताना डम्पिंगचा प्रश्न सोडवण्याऐवजी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी आग विझेपर्यंत चार दिवस दुसरीकडे राहायला जा, असा अजब सल्ला नागरिकांना दिल्याने त्यावर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या विधानावर मनसे, शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे सोमवारी सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुन्हा शहरात रास्ता रोको केला. डम्पिंगच्या मुद्यावरून राजकीय पक्षांनी दिवसभर आंदोलने, स्टंटबाजी केल्याने डम्पिंगचे राजकारण चांगलेच रंगले.

आधारवाडी डम्पिंगला शनिवारी लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केल्याने परिसरातील रहिवासी घुसमटले. हवेत पसरलेल्या उग्र दर्पाचा रहिवाशांना प्रचंड त्रास झाला. सोमवारीही शहरात धुराचे लोट दिसत होते. रविवारी  महापालिका आयुक्त वेलरासू यांनी आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी डम्पिंगची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असले, तरी आग पूर्णपणे विझण्यास तीन ते चार दिवस लागतील. त्यामुळे  नागरिकांनी परिसर रिकामा करावा, असा सल्ला दिला. या सल्ल्यावर संताप व्यक्त करत तेथील रहिवाशांनी आम्हाला  आयुक्तांनी त्यांच्या बंगल्यात राहण्याची सुविधा करून  द्या, अशी मागणी केली. 

काँग्रेसचा रास्ता रोको 

काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी डम्पिंग ग्राऊंड परिसरात रस्ता रोको करत डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास आलेल्या गाड्या अडवून धरल्या. खडकपाडा पोलिसानी आंदोलनस्थळी धाव घेत काही आंदोलकांना ताब्यात घेतले. 

आयुक्तांच्या दालनाला बांगड्यांचा हार  

डम्पिंग ग्राऊंडमध्ये लागणार्‍या आगीवर नियंत्रण ठेवण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मनसेने सोमवारी दुपारी महापालिका आयुक्तांच्या गैरहजेरीत त्यांच्या दालनाला बांगड्यांचा हार घालत निषेध व्यक्त केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी महापालिका मुख्यालयात प्रवेश करीत आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्त एका लग्न समारंभासाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आल्याने मनसेच्या पदाधिकार्‍यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी आयुक्तांच्या दालनाला बांगड्यांचा हार घालत निषेध नोंदवला. यावेळी मनसेचे ज्येष्ठ पदाधिकारी काका मांडले, शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, माजी आ. प्रकाश भोईर उपस्थित होते. 

शिवसेनेचा ठिय्या

मनसेचे आंदोलन उरकताच शिवसेनेचे पदाधिकारीही आयुक्तांच्या दालनासमोर धडकले. जोपर्यंत आयुक्त आम्हाला भेटत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, अरविंद मोरे, उपशहर प्रमुख विजय काटकर यांच्यासह पदाधिकारी-नगरसेवक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.