Thu, Jul 09, 2020 06:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोरिवलीत दोन मुली झाल्याने डॉक्टर पत्नीला घराबाहेर काढले

दोन मुली झाल्याने डॉक्टर पत्नीला घराबाहेर काढले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

बोरिवलीमधील 38 वर्षीय डॉक्टर पत्नीला दोन मुली झाल्याने पती आणि सासूने घराबाहेर काढल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनीही या पीडित डॉक्टर महिलेला मदत करण्याचे सोडून तिला समुपदेशनाचा सल्ला दिला. अखेर तिच्या तक्रारीवरून डॉक्टर पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करून बोरिवली पोलिस तपास करत आहेत.

डॉक्टर तरुणीचा बोरिवलीमध्ये रहात असलेल्या डॉक्टर तरुणासोबत विवाह झाला. काही महिने चांगला संसार केल्यानंतर पतीने गोड बोलून ती नोकरी करत असलेल्या तिच्या काकांच्या हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट पदावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळविली. विवाहापूर्वी नोकरी करत असताना पत्नीने लाखो रुपये कमवले असून वडिलांसोबत तिचे जॉईंट बँक खाते असल्याची माहिती त्याला मिळाली. त्याने वडिलांचे नाव काढून त्याजागी आपले नाव घातले. मात्र, तो आपले वेतन या खात्यात जमा करत नव्हता. बँक खात्यात जमा असलेली रक्‍कम, ऑक्टोबर 2010 ते नोव्हेंबर 2016 पर्यंत जमा झालेला पगार असे एकूण 54 लाख रुपये त्याने काढून घेतले. तो तिला खर्चाला पैसे देत नव्हता. तिने विचारणा केली असता शिवीगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत होता.

लग्‍नाच्या वाढदिवसादिवशी हट्ट करून त्याने सासर्‍यांकडून नवीन आयफोन घेतला. पतीकडून गोड बोलून, मारहाण करून लुटणे सुरू असताना पीडितेला दोन मुली झाल्या. त्यामुळे पतीसह सासूकडूनही तिला शारीरिक आणि मानसिक त्रास सुरू झाला. पती मारहाण करून वडिलांकडून पैसे आणि दागिने आणण्याची मागणी करत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने आपला पगार पतीसोबतच्या जॉईंट खात्यात भरणे बंद केले. यावरून वाद विकोपाला जाऊन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

मे 2017 मध्ये पती आणि सासूने दोन्ही मुलींसोबत तिला घराबाहेर हाकलले. ती आता वडिलांसोबत माहेरी रहात आहे. मात्र, पतीने तिला पूर्णपणे लुटले असून दरमहा वेतनाचे जाम झालेले भविष्य निर्वाह निधीत जमा झालेले 36 लाख 29 हजार, पीडितेने काढलेले शेअर्स विकून मिळालेले 13 लाख 22 हजार, मालाड पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलेले 13 लाख 82 हजार, ओळखीच्या व्यक्‍तीकडून कर्जाऊ दिलेली रक्‍कम व्याजासह मिळालेले 12 लाख 51 हजार, पीडितेच्या पगारातून 85 लाख कर्ज भरून घेतलेला 1 कोटी 85 लाखांचा फ्लॅट असे सर्व या डॉक्टर पतीने हडप केल्याचा आरोप करत पीडितेने पोलिसांत धाव घेतली आहे.


  •