Wed, Apr 24, 2019 16:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारच्या धोरणांमुळे सामान्य माणूस उद्ध्वस्त

सरकारच्या धोरणांमुळे सामान्य माणूस उद्ध्वस्त

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 01 2018 11:23PMमुंबई :  प्रतिनिधी

राज्य व केंद्र सरकार मोठ-मोठ्या घोषणा करून सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे. रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकारच्या धोरणांमुळे सामान्य व्यक्‍ती उद्ध्वस्त होत असून बँका धोक्यात आल्या आहेत, या सरकारला परत पाठवून परिवर्तन करण्याची वेळ आली आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.आझाद मैदानात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना महिन्याभराच्या सर्व खर्चासाठी केवळ 900 रुपये दिले जातात. रेशनवर गहू व तांदूळ देण्याऐवजी पशुखाद्य असलेला मका दिला जात आहे. त्यामुळे सामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बेकारीचे थैमान वाढत आहे. गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नोटा बंदीचा निर्णय घेतल्याचा फटका सहकारी बँकांना व त्यामध्ये पैसे भरलेल्या नागरिकांना बसला आहे. मात्र, आता आरबीआय आपली जबाबदारी झटकत आहे. नीरव मोदी प्रकरणामुळे लहान उद्योजकांकडे बँका संशयाने पाहू लागल्या आहेत. सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जात आहे. नागरिक सरकारच्या अच्छे दिनला कंटाळले असून जुने दिवस मागत असल्याचे पवार म्हणाले. राज्य सरकार नादान सरकार असून रिक्‍त पदे भरण्याऐवजी बेरोजगारी वाढवली जात आहे. महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होत आहे. सरकार केवळ घोषणाबाजीमध्ये मश्गुल आहे, त्यांना परत पाठवण्याची गरज त्यांनी व्यक्‍त केली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. मजीद मेमन, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, हेमंत टकले, प्रफुल्ल पटेल, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड,  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अनिल देशमुख, किरण पावसकर, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, नवाब मलिक, पंकज भुजबळ, संजय दिना पाटील, आनंद परांजपे, शिवाजीराव गर्जे, प्रकाश गजभिये यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, सरकारकडून प्रचंड फसवणूक केली जात आहे. सेना-भाजपची मिलीभगत आहे. मराठी भाषेची गळचेपी झाल्याची नैतिक जबाबदारी शिवसेनेने घेतली नाही. एमयुटीपी प्रकल्प आम्ही सुरू केला तेव्हा आमची चेष्टा केली गेली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगार अधिक अडचणीत आले आहेत. सत्ताधारी दोन्ही पक्षातील वितंडवाद सर्वांसमोर आले आहेत. मंत्रालयाची सर्कस बनवण्याचे काम सरकारने केले आहे. सरकारला ऑफलाईन करण्याचा निर्धार त्यांनी केला. शिवसेना-भाजपचा बुरखा फाडणार व सरकारला पदच्युत करून परिवर्तन करेपर्यंत हल्लाबोल सुरू राहणार, असा इशारा त्यांनी दिला.

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले, उद्याचा महाराष्ट्र घडवण्यात राष्ट्रवादीची मोठी भूमिका राहील. सरकारच्या धोरणांमुळे सगळे धंदे चौपट झाले आहेत. मुंबइचे आर्थिक क्षेत्रातील पहिले स्थान कायम आहे का, हे तपासण्याची वेळ आली आहे. मुंबईची आर्थिक परिस्थिती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई प्रत्येक बाबतीत मागे पडत आहे. विमानतळाला आम्ही 2006 मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, या सरकारने भूमिपूजन करायला चार वर्षे लावली.