Thu, Jul 18, 2019 10:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भूकंपाच्या भीतीमुळे ग्रामस्थांचे शेतात वास्तव्य

भूकंपाच्या भीतीमुळे ग्रामस्थांचे शेतात वास्तव्य

Published On: Dec 29 2017 1:46AM | Last Updated: Dec 29 2017 1:25AM

बुकमार्क करा
जव्हार : तुळशीराम चौधरी

मागील आठवड्यापासून जव्हार तालुक्यात भूकंपाचे हादरे बसत आहेत. 25 डिसेंबरच्या तीव्र धक्क्यामुळे तालुक्यातील वाळवंडा ग्रामपंचायतीतील अनेक घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे येथील आदिवासी भयभीत झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आदिवासी घरदार सोडून ऐन थंडीत घराबाहेर व शेतावर वास्तव्यास गेले आहेत. त्यामुळे संपूर्ण गांव, शाळा व अंगणवाड्या भूकंपाच्या भीतीखाली आहेत.

जव्हार शहरासह लगतच्या गाव-पाड्यांना चार वर्षांपूर्वी भूगर्भातील हालचालींमुळे जमिनीला हादरे बसण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात जव्हारसह वाळवंडालगतच्या गाव-पाड्यांना भूकंपाचे हादरे बसले . विशेषत: 25 डिसेंबर रोजी बसलेल्या  धक्क्याची तीव्रता मागील धक्क्यांपेक्षा अधिक होती. त्यामुळे वाळवंडा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पाडे हादरले असून अनेक घरांना तडे गेले आहेत. सुमारे 2,321 लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायत हद्दीत 6 पाडे असून 513 घरे आहेत. या घटनेमुळे येथील आदिवासी भयभीत झाले असून त्यांनी आपले घरदार सोडून जीव वाचवण्यासाठी माळरानावरच्या शेताचा आसरा घेतला आहे. काही ग्रामस्थ रात्री अंगणात सावधपणे झोपत आहेत. भूकंपाच्या दहशतीमुळे संपूर्ण गाव भीतीच्या सावटाखाली वावरत आहे.

विशेष म्हणजे वाळवंडा गाव परिसरात प्रगतशील शेतकरी आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ रोजगारासाठी स्थलांतर करत नाहीत. गावातील शाळा व अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के असते. मात्र, भूकंपाच्या दहशतीने लोकांनी गाव सोडल्याने या अंगणवाडी आणि शाळाही ओस पडल्या आहेत. याबाबत माहिती मिळताच, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जव्हारचे बालविकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर मुंडे यांनी तातडीने वाळवंडा गावाला भेट देऊन तेथील अंगणवाडीची पाहणी केली. यावेळी संपूर्ण वाळवंडा गावच ओस पडल्याचे आढळले असून अंगणवाडीच्या इमारतीलाही तडे पडल्याची माहिती राजेंद्र पाटील यांनी दिली.