युती निश्चित झाल्याने राणेंचा प्रवेश अडचणीत

Published On: Sep 23 2019 2:18AM | Last Updated: Sep 23 2019 2:13AM
Responsive image


मुंबई : विशेष प्रतिनिधी 

भाजप-शिवसेनेची विधानसभा निवडणुकीतील युती पक्की झाल्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश अडचणीत आला आहे. राणेंच्या प्रवेशाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्यामुळेच भाजपने हा निर्णय लांबणीवर टाकल्याचे समजते. 

नारायण राणे हे आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. स्वत: राणेंनी जाहीररीत्या ही इच्छा बोलून दाखविली आहे. मात्र, निवडणूक जाहीर झाली तरी राणेंच्या प्रवेशावर भाजपने कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपने तीनवेळा प्रवेेश सोहळे आयोजित करून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतले. 

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनाही दिल्लीत प्रवेश देण्यात आला. मात्र, राणेंना अजूनही ताटकळत ठेवण्यात आले आहे. आणखी काही नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात येणार असला तरी राणेंच्या प्रवेशाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. 

राणेंंच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, राणेंच्या प्रवेशाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केल्याचे समजते. 

भाजप- शिवसेना युती होईल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, युतीतील जागावाटपाचा तोडगा द़ृष्टिपथात आल्याने घटस्थापनेला युती जाहीर केली जाणार आहे. युती झाल्यास राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यात कोणतीही अडचण नसताना राणेंना प्रवेश देण्याची आवश्यकता काय? असा मुद्दा शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनीही राणेंच्या प्रवेशावर निर्णय घेणे टाळले आहे.