होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसच्या ११ मुख्यमंत्र्यांमुळे मराठ्यांची अधोगती : सदाभाऊ

काँग्रेसच्या ११ मुख्यमंत्र्यांमुळे मराठ्यांची अधोगती : सदाभाऊ

Published On: Jul 28 2018 2:01AM | Last Updated: Jul 28 2018 1:36AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

युती सरकारचा अपवाद वगळता राज्यात सत्तेत असलेले काँग्रेसचे अकरा मुख्यमंत्री मराठा समाजाच्या अधोगतीला कारणीभूत असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी केला आहे. या मुख्यमंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळेच राज्यातील मराठा समाजाला मोर्चे काढण्याची वेळ आली, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली.

ते म्हणाले, काँग्रेसची सत्ता असताना मराठा समाजातील काही मूठभर लोक मातब्बर झाले. मात्र, एक मोठा वर्ग विकासापासून अद्यापही वंचित आहे. मराठा समाज हा शेतकरी समाज आहे. या समाजाच्या हितासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काहीही ठोस निर्णय न घेतल्याची भावना मराठा तरुणांच्या मनात धगधगत असल्यामुळे ते आज रस्त्यावर उतरून आक्रमक झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. या काळात मराठा समाजाला शैक्षणिकदृष्ट्या आणि रोजगाराच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी भाजप सरकारने योजना आणल्या. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्ती व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योगधंदे करू इच्छिणार्‍या तरुणांना वित्तीय सहाय्य करण्याची योजना हा त्याचाच एक भाग आहे.

तत्कालीन काँग्रेसचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा वापर केवळ स्वतःसाठी केला. साखर कारखाने आणि सहकारी संस्था निर्माण करून संस्थानिक झालेल्या या नेत्यांना मराठा समाजाच्या विकासाचे सोयरसुतक नाही, असा आरोपही खोत यांनी केला.