Sun, Apr 21, 2019 06:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संथगती कामामुळे भुयारी मेट्रो रेंगाळणार

संथगती कामामुळे भुयारी मेट्रो रेंगाळणार

Published On: May 12 2018 1:48AM | Last Updated: May 12 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो वेगाने पूर्ण होणार असल्याचा दावा जरी करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात कुलाबा ते सीप्झ हा मेट्रो-3 प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होण्यासाठी 2023 ते 2025 वर्ष उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 भुयारी मार्गिकेच्या कामासाठी सर्व टनेल बोअरिंग मशिन (टीबीएम) जरी कार्यरत नसल्या तरी केवळ सहा महिन्यांत दोन कि.मी.चे अंतर मेट्रोने कापले असल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे. मात्र मेट्रोच्या खोदकाम करणार्‍या 17 टीबीएम मशिन जरी कार्यरत झाल्या तरी दिवसाचे अंदाजे 20 मीटर खोदकाम जरी गृहीत धरले तरी 33.5 कि.मी.चा हा मार्ग बांधण्यासाठी अंदाजे 2023 ते 25 साल उजाडण्याची शक्यता असल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मेट्रोच्या टीबीएम मशिनचे शाफ्ट टाकण्यासाठी अजूनही सर्व साईटवर खोदकाम सुरू करण्यात आलेले नाही. 

जरी दिवसाचे 20 मीटर बांधकाम गृहीत धरले तरी सर्व स्थानकांची बांधणी पूर्ण करणे, बोगद्यात ट्रॅक टाकणे आदी कामांना प्रचंड वेळ लागणार आहे. ओएचई वायर व एकूण 27 स्थानकांची बांधणीची वेळ गृहीत धरता ही मार्गिका साल 2023 ते 2025 दरम्यान तयार होईल असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.