Fri, Jan 18, 2019 08:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  ‘महारेरा कार्पेट’मुळे घरे महागण्याची भीती

 ‘महारेरा कार्पेट’मुळे घरे महागण्याची भीती

Published On: Mar 01 2018 2:16AM | Last Updated: Mar 01 2018 2:16AMमुंबई : प्रतिनिधी 

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) एका परिपत्रकाद्वारे कार्पेट क्षेत्रफळ म्हणजे नेमके काय हे स्पष्ट केले आहे. आगामी विकास आराखड्यामध्ये महारेराप्रमाणेच कार्पेट क्षेत्रफळाची व्याख्या कायम ठेवण्यात आली असून आराखडा मंजूर झाल्यास याबाबतची तातडीने अंमलबजावणी होणार आहे. यामुळे सध्याचे प्रतिचौरस फुटाचे दर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाले तर घरांच्या किमतीही वाढू शकतात.

महारेराने केलेली कार्पेट क्षेत्रफळाची व्याख्या आणि विकास आराखड्यात सुसूत्रता राहावी यासाठी उच्चस्तरीय समितीने तशी मान्यता दिली आहे. ही व्याख्या मंजूर झाल्यावर अनेक विद्यमान प्रकल्पात प्रत्यक्ष कारपेट क्षेत्रफळ कमी होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी पैसे मोजावे लागणार असले तरी प्रतिचौरस फुटाचा दर मात्र विकासकांकडून वाढवला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

बाल्कनी, व्हरांडा, डेक, सर्व्हिस एरिया, फ्लॉवर बेड असे वगळून जे क्षेत्रफळ येते त्याला कार्पेट म्हटले जाते. हे नेमके काय असेल हे स्पष्ट करणारे परिपत्रक 14 जून 2017 रोजी महारेराने जारी केले होते. हे परिपत्रक जारी करताना सोबत आराखडेही जोडण्यात आले होते. त्यामुळे नेमक्या कार्पेट क्षेत्रफळाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. महारेराने केलेली कार्पेट क्षेत्रफळाची व्याख्या मंजूर झाल्यावर अनेक विद्यमान प्रकल्पात प्रत्यक्ष कारपेट क्षेत्रफळ कमी होणार आहे. परिणामी ग्राहकांनाही कमी पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र यामुळे प्रति चौरस फुटाचा दर विकासकांकडून वाढवला जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महारेराने नोंदणी झालेल्या विकासकांना आपण कुठल्या दराने सदनिकेची विक्री करणार आहोत हे सुद्धा नमूद करावे लागते. अशा विकासकांना मात्र त्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र नव्याने महारेराकडे नोंदणी करतील अशा विकासकांकडून प्रति चौरस फुटाचा दर वाढविला जाण्याची शक्यता असून त्यास महारेराही बंधन घालू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.