Thu, Jul 18, 2019 10:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आर्थिक चणचणीमुळे पोलीसभरती मंदावली

आर्थिक चणचणीमुळे पोलीसभरती मंदावली

Published On: Aug 28 2018 1:45AM | Last Updated: Aug 28 2018 1:24AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील वाढती लोकसंख्या, त्याप्रमाणात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि झपाट्याने होत असलेले नागरीकरण यामुळे 61 हजार 494 पोलिसांची भरती करणे आवश्यक असताना काँग्रेस आघाडी व त्यानंतर आलेल्या युती सरकारने आतापर्यंत केवळ 25 हजार 597 पोलिसांचीच भरती केली आहे. राज्यात अजूनही 35 हजार 897 पोलीस भरतीची गरज आहे. सध्याच्या सरकारने मागील चार वर्षात केवळ 2 हजार 733 पोलिसांची भरती केली आहे. आर्थिक अडचणीमुळे राज्यातील पोलीस भरती मंदावली असल्याची माहिती गृह विभागातील अधिकार्‍याने दिली.

पोलीस महासंचालकांनी 2011 मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात  61 हजार 494 पोलिसांची भरती करणे आवश्यक असल्याचे गृह विभागाला कळविले होते. शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारीमध्ये झापाट्याने वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अनेक शहरामध्ये आवश्यकतेनुसार पोलीस बळ उपलब्ध नाही. सशस्त्र पोलीस आणि राज्य राखीव दलाची मदत घेण्याची वेळ अनेक पोलीस ठाण्यांना वारंवार घ्यावी लागत आहे. राज्यातील पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारने या शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करण्यासोबतच 2600 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 2011 पर्यंत 61 हजार 494 पोलिसांची आवश्यकता होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने 2011 ते 2014 या काळात 22 हजार 864 पोलिसांची भरती केली. 

मागील चार वर्षात राज्यातील भाजपा-शिवसेनेच्या युती सरकारने केवळ 2 हजार 733 पोलिसांची भरती केल्याची माहिती घाडगे यांना दिली आहे.पोलीस महासंचालकांच्या अहवालानुसार राज्य सरकारने यापूर्वीच पोलिसांची भरती केली असती तर मराठा आंदोलनावेळी झालेला उद्रेक व कोरेगाव भीमा सारख्या घटना रोखता आल्या असत्या.  मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.