Tue, Mar 26, 2019 01:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हरहुन्नरी डॉक्टरांमुळे मुंबईत रुग्णसेवा सुरळीत

हरहुन्नरी डॉक्टरांमुळे मुंबईत रुग्णसेवा सुरळीत

Published On: Aug 09 2018 2:06AM | Last Updated: Aug 09 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी

सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी सरकारी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले. यामुळे पहिल्याच दिवशी सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडली. मात्र संपाच्या दुसर्‍या दिवशी जे.जे. आणि नायर रुग्णालयातील डॉ़क्टरांनी अष्टपैलू भूमिका पार पाडल्याने रुग्णसेवा सुरळीतपणे सुरु होती.

नेहमी टीकेचे लक्ष ठरलेले सरकारी रुग्णालयातील डॉक्टर बुधवारी मात्र रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कौतुकास पात्र ठरले. बुधवारी जे.जे. रुग्णालय आणि नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांना तपासण्यासोबतच सुरक्षारक्षक, वॉर्डबॉय, नर्स आणि कक्षसेवक तसेच टेलिफोन ऑपरेटर यांसारखी सर्व कामे डॉक्टरांनी केली. त्यांच्या मदतीला 200 शिकाऊ नर्सेस आणि 200 मेडिकल स्टुडंट मद्तीला आले. त्यामुळे दूरवरुन आलेल्या रुग्णांना संपाची झळ बसली नाही. शिकाऊ डॉक्टर आणि नर्सेसच्या सहकार्याने नेहमीप्रमाणे रुग्णालयातील कामकाज सुरळीतपणे चालले. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली नाही. 

जे.जे. रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची संख्या ही साधारणपणे 2500 च्या आसपास आहे. मात्र संपामुळे यांच्या गैरहजेरीत 200 शिकाऊ डॉ़क्टर, 200 नर्सिंगच्या विद्यार्थ्यीनी व बाहेरुन आलेले 55 सफाई कामगार यांनी चांगली मदत केली. नेहमीप्रमाणेच दुपारी चार वाजेपर्यंत रुग्णालयात ओपीडीमध्ये 2917 रुग्णांना तपासण्यात आले. तर अपघात विभागात 49 रुग्णांची तपासणी करण्यात आली. गंभीर आजार असणार्‍या सुमारे 70 रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. विशेष म्हणजे दिवसभरात एकूण 12 शस्रक्रियाही करण्यात आल्या. शिवाय प्रसुती विभागात 4 महिलांची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी दिली. जे. जे. रुग्णालयात सफाई कर्मचारी, कक्षसेवक असे एकूण 1138 कर्मचारी असतात. तसेच 975 नर्सेस कामावर असतात, मात्र संपामुळे या सर्वांची कामे शिकाऊ डॉक्टर 200, शिकाऊ नर्सेस 200 आणि नव्याने कामावर घेतलेल्या 55 सफाई कर्मचार्‍यांना करावी लागली. या सर्वांनी चोखपणे कामगिरी बजावल्याने रुग्णांनाही दिलासा मिळाला. शिकाऊ डॉक्टरांनी रुग्णांना सकाळच्या नाश्त्यापासून  दुपार आणि संध्याकाळचे जेवण वाटप केल्याने रुग्णांकडून त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यात आले.

डॉक्टरांनी लंचटाईम सोडला

मुंबईच्या नायर रुग्णालयात रोज हजारो रुग्ण येत असतात. कधी कधी रुग्णालयीन कर्मचार्‍यांच्या लंचटाईममुळे अनेकदा रुग्णांना ताटकळत राहावे लागायचे. परिणामी काही रुग्ण कंटाळून घरी निघूनही जायचे, मात्र बुधवारी संपकाळात लंचटाईममुळे रुग्णांना ताटकळत राहावे लागल्याचे समजताच नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी चक्क आपला लंचटाईम सोडला आणि स्वत:ला रुग्णसेवेला वाहून घेतले.

जे.जे. रुग्णालयात अतिमहत्वाच्या 12 शस्त्रक्रिया

सकाळपासून ओपीडीमध्ये 2917 रुग्णांना तपासण्यात आले. शिवाय अपघात विभागात देखील 49 रुग्णांवर उपचार करण्यात आले. ओपीडीतील तपासणीनंतर 70 रुग्णांना रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करुन घेण्यात आले. अतिमहत्त्वाच्या अशा एकूण 12 शस्रक्रियादेखील करण्यात आल्या.  शिवाय प्रसुती विभागात एकूण चार महिलांची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आल्या. दिवसभरात एकूण 30 रुग्णांचे एमआरआय करण्यात आले. 45 रुग्णांचे सीटीस्कॅन, एक रुग्णाचा डीएसए आणि सुमारे 450 रुग्णांचे एक्स-रे करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.