Fri, Jul 19, 2019 07:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेनड्राईव्हमुळे रेकॉर्डिंग कंपन्यांनी गुंडाळला गाशा: सुरेश वाडकर

पेनड्राईव्हमुळे रेकॉर्डिंग कंपन्यांनी गुंडाळला गाशा: सुरेश वाडकर

Published On: Jan 22 2018 1:48AM | Last Updated: Jan 22 2018 1:48AMमुंबई : चंदन शिरवाळे

शंभर - सव्वाशे रुपये किमतीच्या पेनड्राईव्हमुळे लाखो रुपयांची गुंतवणूक असलेल्या रेकॉर्डिंग कंपन्या बंद पडू लागल्या आहेत. मराठी भक्तिगीते, भावगीते व लोकसंगीताला सर्वोमुखी घेऊन जाणार्‍या हिज मास्टर्स व्हाईस अर्थात ‘एचएमव्ही’ या कंपनीपाठोपाठ कॅसेट आणि सीडी कंपन्या एकामागोमाग आपला गाशा गुंडाळू लागल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून लोकसंगीतासह भक्तिगीते व भावगीतांची नवनिर्मिती बंद झाली असून जुनी गाणी काळाच्या पडद्याआड जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

रेकॉर्डिंग कंपन्या बंदचा सर्वाधिक फटका नवोदित कलावंतांना बसला आहे. नावारुपाला येण्याची त्यांची संधीच हुकली आहे. एचएमव्ही या कंपनीने राज्यातील अनेक गायक, संगीतकारांना संधी दिली होती. खेड्यापाड्यात राहणार्‍या साध्या कलावंतांना प्रकाशझोतात आणण्यासोबतच मराठी लोकसंगीत, भावगीते व भक्तिगीते घरा-घरांमध्ये पोहोचविण्याचे काम या कंपनीने केले होते. कोलम्बो रेकॉर्ड कंपनीचाही त्यामध्ये हातभार होता. मात्र, लोकसंगीताचा सुवर्णकाळ बहरत असतानातच या दोन्ही कंपन्यांपुढे विविध कॅसेट कंपन्यांनी आव्हान उभे केले.

सुरुवातीच्या काळात एचएमव्ही ही एकमेव ध्वनिमुद्रण कंपनी होती. त्यामुळे कित्येकांना संधी मिळत नव्हती. रेकॉर्डमध्ये दोन गीते ध्वनिमुद्रीत केली जात होती. नंतर टप्प्या-टप्प्याने त्यामध्ये वाढ करत ही संख्या चारहून आठवर पोहोचली होती. कॅसेटमध्ये 10 ते 12 गीतांचे एकाच वेळी ध्वनिमुद्रण केले जात असल्यामुळे रेकॉर्डपेक्षा कॅसेटच ग्राहकांना परवडू लागल्या होत्या. व्हीनस, टी सीरिज, विंग्जस, स्टीप्स या कॅसेट कंपन्यांनी बाजार ताब्यात घेतल्यामुळे एचएमव्हीने रेकॉर्ड (तबकडी) निर्मिती थांबवून काही वर्षे कॅसेटच्या माध्यमातून व्यवसाय केला. कॅसेट कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्यामुळे अनेक गायक, गीतकार व संगीतकारांना काम मिळू लागले. नवोदित कलावंतांना याचा सर्वाधिक फायदा झाला.

परंतु,नामांकित कॅसेट कंपन्यांच्या ध्वनिमुद्रणाचे जादा भाडे सामान्य कलावंतांच्या आवाक्याबाहेर होते. काही व्यवसायीक लोकांनी मुंबई, ठाणे परिसरात अनेक लहान रेकॉर्डिंग कंपन्या सुरू केल्या. त्यातच सीडी आणि व्हीसीडीने आक्रमण केल्यामुळे कॅसेट आणि रेकॉर्डिंग कंपन्या बंद झाल्या. व्हीसीडींमुळे चांगल्या चेहर्‍याचे गायक आणि सहाय्यक कलावंतांना संधी मिळू लागली. या माध्यमातून भारुड, दशावतार. खडी गमंत सारख्या कला नव्या पिढ्यांसमोर आल्या. मात्र, पेनड्राईव्ह बाजारात आल्यामुळे ग्राहकांनी कॅसेट, व्हीसीडी खरेदी करणे बंद केले. एका पेनड्राईव्हने पुढील पिढ्यांचे गायक, संगीतकार व सहकलाकारांच्या कलेचा जणु बळी घेतला आहे.