Thu, Jul 16, 2020 09:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रोच्या कामांमुळे बाप्पाचे आगमन खड्ड्यांतूनच!

मेट्रोच्या कामांमुळे बाप्पाचे आगमन खड्ड्यांतूनच!

Published On: Aug 04 2018 1:40AM | Last Updated: Aug 04 2018 1:01AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे अनेक रस्ते खराब झाले असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बाप्पाच्या आगमनापुर्वी बुजवण्याची जबाबदारी मेट्रोचीही आहे. पण गणेशोत्सवापूर्वी आयोजित केलेल्या महापालिकेचे अधिकारी आणि समन्वय समितीच्या बैठकीला मेट्रोच्या अधिकार्‍यांनी दांडी मारून जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातून होणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.  

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ व अन्य मंडळे तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी महापालिकेच्या वतीने दरवर्षी प्रकाशित करण्यात येणार्‍या गणेशोत्सव 2018 या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाले. यावेळी  गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर यांनी मुंबईतील खड्डयांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. तर मुंबईतील अनेक भागांमध्ये सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवले कसे जाणार असा सवाल त्यांनी केला. यावर श्री गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरुन घ्यावे. महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल, याचेही नियोजन करण्याबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी निर्देश दिले.

या बैठकीला मेट्रो रेल्वेचे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे मेट्रो रेल्वेच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे राहिला. बाप्पाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम प्रशासनाकडून पूर्ण केले जाईल. संबंधित गणेशमंडळानी खड्ड्यांबाबत त्या त्या विभागाचे उप आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्याकडे आपली तक्रार नोंदविल्यानंतर लगेच खड्डे बुजविण्यात येईल अशी ग्वाही महापालिका अतिरिक्त आयुक्त अजोय मेहता यांनी यावेळी दिली. तर मेट्रोच्या अधिकार्‍यांसोबत वाहतूक पोलिसांनी समन्वय साधून खड्डे बुजवून घेण्यासाठी प्रयत्न करावा, अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.