Wed, Jan 16, 2019 12:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तलासरीत कुपोषणामुळे एक वर्षाच्या चिमुरड्याचा बळी

तलासरीत कुपोषणामुळे एक वर्षाच्या चिमुरड्याचा बळी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तलासरी : वार्ताहर

तलासरीतील बारातपाडा येथील कातकरी कुटुंबातील स्वप्नील मंगेश मुकणे या एकवर्षीय बालकाचा सोमवारी कुपोषणामुळे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. कुपोषण रोखण्यात सरकार आणि प्रशासन अपयशी ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. विशेष म्हणजे स्वप्नील अतितीव्र कुपोषित असल्याची कोणतीही नोंद अंगणवाडी तसेच अधिकार्‍यांकडे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

रविवारी स्वप्नीलची प्रकृती कुपोषणामुळे अचानक खालावली. त्याला त्याची आई व नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारासाठी नकार देऊन त्याला अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रिक्षेने दादरा नगर हवेली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, कुपोषित स्वप्नीलची प्रकृती अधिक खालावल्याने सोमवारी दुपारी मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर दुसर्‍या रुग्णालयात हलवण्याकरिता विनामूल्य शासकीय रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयातून पुरवण्यात आली नसल्याचा आरोप स्वप्नीलच्या पित्याने केला आहे. ज्या पाड्यात स्वप्नील आणि त्याचे कुटुंब राहते. त्या ठिकाणाहून 150 ते 300 मीटर अंतरावर दोन अंगणवाड्या आहेत. असे असतानाही त्याचा कुपोषणाने बळी गेल्याने अंगणवाडीच्या एकूणचा कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे स्वप्नील अतिकुपोषित असतानाही तो कुपोषित असल्याची कोणतीही नोंद अधिकारी किंवा अंगणवाडीत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तालुक्यातील अनेक कुपोषित बालकांच्या नोंदी शासकीय दप्तरी करण्यात आल्या नाहीत. स्वप्नीलच्या नावाच्या नोंदी पारसपाडा येथील अंगणवाडीत असल्या तरी तीव्र कुपोषित बालक म्हणून अंगणवाडी दप्तरी नोंद करण्यात आली नाही. 

पारसपाडा अंगणवाडी गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असून इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनली आहे. त्यामुळे येथील बालकांना अंगणवाडीच्या ओटीवर पोषण आहार देण्यात येत आहे.तसेच तलासरी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर झाल्यानंतर आजतागायत अंगणवाडीत बालकांना अंडी, केळी मिळत नसल्याची गंभीर बाबही उघड झाली आहे.