होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांड 

जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांड 

Published On: Apr 28 2018 2:00AM | Last Updated: Apr 28 2018 1:20AMउल्हासनगर : वार्ताहर

जमिनीच्या वादाचा राग मनात धरून मोटरसायकलवरून जाणार्‍या दाम्पत्याला टँकरद्वारे चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी 4 जणांविरुद्ध उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, टँकरचालक अरविंदकुमार कोरी(22) याला पोलिसांनी अटक केली आहे. वासुदेव शेंद्रे (50) आणि रेखा (40) असे या दाम्पत्याचे नाव आहे. 

वासुदेव यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. ते दुचाकीवरून निघाले असता पाठीमागून त्यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांच्यासह त्यांच्या पत्नालाही चिरडून ठार मारण्यात आले.  या घटनेची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचा चार्ज असलेले पो. नि. एस. के. जाधव यांना मिळताच यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वासुदेव व रेखा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याठिकाणाहून टँकर जप्त केला आहे. ही घटना घडल्यावर टँकरचालक अरविंदकुमार पळून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. 

या घटनेप्रकरणी कैलास शेंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात विलास, विनोद, बाळाराम व टॅँकरचालक अरविंदकुमार या चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अरविंदकुमार याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता 2 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे. इतर फरार असलेल्या तिघांचा शोध पोलीस घेत असून अधिक तपास पो. नि. सुनील जाधव करीत आहेत. 

Tags : Mumbai, mumbai news, Dual massacre, land dispute,