Tue, Jul 23, 2019 01:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डीएसके, 50 कोटी कसे देणार ते सोमवारपर्यंत सांगा

डीएसके, 50 कोटी कसे देणार ते सोमवारपर्यंत सांगा

Published On: Dec 01 2017 9:44AM | Last Updated: Dec 01 2017 9:44AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. ते खपवून घेतले जाणार नाही, ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी 50 कोटी कसे जमा करणार ते सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर सांगा, अन्यथा अंतरिम जामीन रद्द केला जाईल, असा खरमरीत इशारा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने दिला.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने आणि पुणे जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या वतीने अॅड. मनोज मोहिते यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर आज न्या. गडकरी यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार कुलकर्णी यांच्या वतीने मालमत्तेची यादी सादर करण्यात आली. ही मालमत्ता बँकेत तारण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयाने संताप व्यक्त केला. तारण ठेवलेल्या मालत्तेची कागदपत्रे सादर करून न्यायालयाची दिशाभूल करू नका. आतापर्यंत कारणे सांगून 3 वेळा मुदत वाढ मिळवली. हे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत, असे कोर्टाने खडसावले.

बॅँकेत तारण ठेवलेली संपत्ती दाखवू नका, असा दम भरल्यानंतर डीएसकेंनी ठेवीदारांची 25 टक्के म्हणजे 50 कोटी रुपये जमा करण्याची तयारी डीएसकेंनी न्यायालयात दर्शविली. याची दखल न्यायालयाने घेतली. 50 कोटी रुपये कसे आणि किती कालावधीत जमा करणारे ते सोमवारी प्रतिज्ञापत्र सादर करा. अन्यथा अंतरिम जामीन रद्द केला जाईल असा इशारा न्यायालयाने डीएसकेंना दिला.

आता हे पैसे जमा करण्यासाठी डीएसके कोणत्या पर्यायाचा अवलंब करतात आणि प्रतिज्ञापत्रात काय नमूद करतात याकडे त्यांचा हजारो गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहेत. डीएसकेंकडे अजून तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या अवधीत त्यांनी तजविज केली नाही तर त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.