Sun, Nov 18, 2018 17:40



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘सुका’च्या पाकिस्तानात फेर्‍या

‘सुका’च्या पाकिस्तानात फेर्‍या

Published On: Dec 20 2017 2:07AM | Last Updated: Dec 20 2017 1:19AM

बुकमार्क करा





मुंबई : अवधूत खराडे

मुंबईत शस्त्रसाठा आणताना रंगेहाथ गजाआड केलेल्या शिवडीतील पठाणी टोळीचा बदयुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत उर्फ सुका (27) याने वडील अकबर आणि अन्य साथिदारांसोबत पाकिस्तान फेर्‍या मारल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांच्या चौकशीत समोर आली आहे. मुळचे पाकिस्तानी असून तीन मुलींचे सासर पाकिस्तानात असून त्यांना भेटण्यासाठी गेल्याचा दावा बादशहा कुटूंबाने केल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तरप्रदेशातील गोदामामधून शस्त्रसाठा यशश्‍वीपणे चोरी करुन मुंबईत आणताना नाशिक चांदवड टोलनाक्यावर हा शस्त्रसाठा जप्त करत नाशिक पोलिसांनी सुका याच्यासह साथिदार सलमान अमानुल्ला खान व नागेश बनसोडे यांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणात तपास करत सुकाचा नंबरकारी आमीर रफीक शेख याचाही गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होताच नाशिक पोलिसांनी त्याला शिवडी क्रॉस रोड परिसरातून अटक करत कसून चौकशी सुरू केली आहे. नाशिक पोलिसांसोबतच केंद्रीय तपास यंत्रणा, राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखेनेही या आरोपींकडे कसून चौकशी करत आणखी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

मुंबईच्या शिवडी, नागपाडा आणि डोंगरीसोबत राजस्थानातील अजमेरमधून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर सुका याच्या पाकिस्तानात झालेल्या फेर्‍यांचीही चौकशी करण्यात येत असून त्याने याआधी कुख्यात मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीम याच्यासह छोटा राजनसाठी काम केल्याचेही सुत्रांकडून समजते. अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेला सुका हा तपासयंत्रणांच्या रडावर असून याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी एटीएसच्या मदतीने गुन्हेशाखेच्या विविध कक्षांमधील अधिकार्‍यांनी एकत्रितपणे काम करत अंडरग्राऊंड झालेल्या सुकाच्या साथिदारांचा शोध सुरू केला आहे.