Tue, Jul 16, 2019 22:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमली पदार्थ तस्कर मर्चंडला तळोजा कारागृहात हलवले

अमली पदार्थ तस्कर मर्चंडला तळोजा कारागृहात हलवले

Published On: Mar 06 2018 1:50AM | Last Updated: Mar 06 2018 12:52AMठाणे : प्रतिनिधी 

ठाणे पोलिसांना 2 हजार कोटींच्या इफेड्रीन अमली पदार्थाची टीप देणारा खबरी कोमिल अन्वर अली मर्चंट (32) यास ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने 15 डिसेंबर 2017 रोजी गोव्यातून अटक केली होती. अमली पदार्थाची तस्करी व विक्री करण्याचा त्याच्यावर आरोप होता. दरम्यान, त्याची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आल्यानंतर तेथे त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता कारागृह प्रशासनाने न्यायालयासमोर व्यक्त केली होती. त्यामुळे कोमिल यास ठाणे कारागृहातून तळोजा कारागृहात हलवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार कोमिल याची नुकतीच ठाण्यातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

कोमिल अन्वर अली मर्चंट हा पोलिसांचा खबरी होता. ठाणे पोलिसांनी पकडलेल्या 2 हजार कोटी रुपयांच्या इफेड्रींन प्रकरणासह अनेक अमली पदार्थ तस्करीच्या टीप त्याने पोलिसांना दिल्या होत्या. पोलिसांचा खबरी असल्याचा फायदा उचलत त्याने ठाण्यात अमली पदार्थ तस्करी व विक्रीचे जाळे पसरवले होते. कोमिल हा गेल्या तीन वर्षांपासून ठाणे, मुंब्रा, कळवा आणि नवी मुंबई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव करीत अमली पदार्थाची तस्करी करीत होता. या अमली पदार्थ तस्कराविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कोमिल हा कुर्ला येथील जावेद नामक कुख्यात अमली पदार्थ तस्कराकडून एमडी खरेदी करत होता. 

दरम्यान, तब्बल तीन वर्षे सर्रास अमली पदार्थाची तस्करी करत असलेल्या कोमिलवर अखेर पोलिसांनी कारवाई करत त्यास 15 डिसेंबर 2017 रोजी गोव्यातून बेड्या ठोकल्या. तेव्हापासून तो ठाणे कारागृहातच होता. मात्र कोमिलने टीप दिलेल्या इफेड्रींन गुन्ह्यातील 15 आरोपी सध्या ठाणे कारागृहात आहेत. त्यामुळे कोमिलवर ठाणे कारागृहात हल्ला होण्याची शक्यता कारागृह प्रशासनाने व्यक्त केली होती. कारागृह प्रशासनाच्या विनंतीनुसार न्यायालयाने कोमिल यास ठाण्यातून तळोजा कारागृहात हलवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार कोमिलची नुकतेच तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.