Wed, Mar 27, 2019 02:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तामिळनाडूत हत्तींवर ड्रोनने नियंत्रण

तामिळनाडूत हत्तींवर ड्रोनने नियंत्रण

Published On: Jul 02 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 1:17AMमुंबई : चंद्रशेखर माताडे

जंगली हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तामिळनाडूने ड्रोनचा उपयोग केला आहे. ड्रोनद्वारे जंगली हत्तींना नियंत्रित करण्याचा प्रयोग तिथे यशस्वी झाला आहे. महाराष्ट्रात मात्र गेल्या 16 वर्षांपासून जंगली हत्तींचा उपद्रव असूनही, त्यांना रोखण्यासाठी चर काढण्यासारखे मध्ययुगीन उपाय राबविले जात आहेत.

तामिळनाडू व कर्नाटकात हत्तींची संख्या जास्त आहे. तेथेही जंगल कमी झाल्याने हत्ती शहरात आले. या हत्तींवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशिक्षित हत्तींकडून त्यांना त्यांच्या वस्तीकडे नेण्यासारखे उपाय आखण्यात आले. या उपायांनी त्यांनी हत्तींवर नियंत्रण आणले असले, तरी अचानक जंगली हत्तींचा कळप गावात शिरल्यास होणारी धावपळ आणि हत्तींमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळता येत नव्हते.

यावर तामिळनाडूत अत्यंत प्रभावी अशी उपाययोजना केली आहे. या ड्रोनच्या सहाय्याने जंगली हत्तींना नियंत्रित करण्याचा उपाय त्यांनी यशस्वी करून दाखविला आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगली हत्तींचा कळप गेल्या 16 वर्षांपासून वावरत आहे. हा कळप अनेकवेळा नागरी वस्तीत येतो. त्याचबरोबर शेतीचे प्रचंड नुकसान होते.

महाराष्ट्राच्या वनखात्याने यापूर्वी ‘एलिफंट बॅक टू होम’ अशी मोहीम राबविली. मात्र, हुशार प्राणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या हत्तींनी ही मोहीम उलटीपालटी करून ‘एलिफंट बॅक फ्रॉम होम’, अशी स्वतःची मोहीम यशस्वीपणे राबवून दाखविली.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा व शाहूवाडी या सात तालुक्यांत जंगली हत्तींचा कळप वावरत आहे. कधी ना कधी हा कळप तेथे येतोच. 12 पैकी सात तालुके या हत्तींनी पायाखाली घातले आहेत. गगनबावडा तालुक्यातील पडसाळीला हत्ती आले होते. मात्र, त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी चर काढण्यासारखे मध्ययुगीन उपाय सुचविले जातात. हत्तीच्या एका सोंडेसरशी कुठल्या कुठे उडून पडणार्‍या सौरकुंपणाचा उपायही सुचविला जातो. 

तामिळनाडूने ड्रोन तयार करून जेथे हत्तींचा कळप येईल, त्या ठिकाणी या ड्रोनच्या माध्यमातून मधमाशांचा आवाज त्याचप्रमाणे चित्रविचित्र आवाज करणार्‍या स्पीकरच्या माध्यमातून हत्तींना माघारी पळवून लावण्यात यश मिळविले आहे. या चित्रविचित्र आवाजाने हत्ती चलबिचल होतात आणि सुरक्षित ठिकाण म्हणून आपल्या अधिवासात परत जातात.  ड्रोनवर स्पीकर आणि अ‍ॅम्प्लिफ्लायर बसवून ही उपाययोजना करण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याच्या संशोधनातून एका मोठ्या मोहिमेला सुरुवात झाली आहे.