मतमोजणीच्या दिवशी सायंकाळी ६ नंतर मद्यविक्री सूरू, उच्च न्यायालयाची परवानगी

Last Updated: Oct 20 2019 8:58PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र

Responsive image

मुंबई : प्रतिनिधी  

मतमोजणीच्या दिवशी २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती उजाल भुयान यांनी ही परवानगी देताना २० व २१ ऑक्टोबर रोजी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी लोक प्रतिनिधी कायद्यातील कलम १३५ सी अंतर्गत मतदानाच्या आधी २ दिवस १९ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजल्यानंतर ते २१ ऑक्टोबरपर्यंत आणि मतमोजणी दिवशी २४ ऑक्टोबरला पूर्ण दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश ४ ऑक्टोबर रोजी दिला होता.             

या आदेशाला महाराष्ट्र वाइन मर्चंट्स असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या याचिकेवर न्यायमूर्ती उजाल भुयान यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मनमानी असून व्यवसाय करण्याच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. असा दावा करताना वाइन विक्रेत्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले .तसेच मतमोजणी झाल्या नंतर सायंकाळी ६ नंतर दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली .

न्यायालयाने उभयपक्षाचा युक्ती वादानंतर २४ तारखेला सांयकाळी ६ वाजल्यानंतर मद्यविक्रीची दुकाने खुली करण्याची परवानगी दिली. मात्र  दिवशी २० व २१ ऑक्टोबर रोजी दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका निकाली काढली.