Thu, Apr 25, 2019 03:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मूकबधिर प्रमिलाचे घराचे स्वप्न पूर्ण; चित्रातून व्यक्त केला आनंद

मूकबधिर प्रमिलाचे घराचे स्वप्न पूर्ण; चित्रातून व्यक्त केला आनंद

Published On: Aug 26 2018 1:45AM | Last Updated: Aug 26 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे शनिवारी वांद्रे पूर्व येथील म्हाडा भवनामध्ये विविध ठिकाणच्या 9 हजार 18 घरांची लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीमध्ये बर्‍याच जणांनी अर्ज भरले होते, मात्र सर्वत्र चर्चा रंगली होती ती प्रमिला दवणे या 28 वर्षीय तरुणीची. प्रमिला ही जन्मापासूनच मूकबधिर आहे. आपल्या स्वप्नातल्या घरासाठी तिने म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज केला होता आणि तिचे स्वप्न शनिवारी साकार झाले. तिला विरार बोळींज येथील म्हाडाचे घर जाहीर होताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

घर मिळाल्यानंतर तिला आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. मात्र मूकबधिर असल्याने तिला आपला आनंद व्यक्त करता येत नव्हता. तिचा हा आनंद तिने आपल्या कलेतून व्यक्त केला. त्यासाठी तिने चित्रकलेचा आधार घेतला. प्रमिलाने तिथल्या तिथे म्हाडा भवनामध्येच चित्र काढून घर लागल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच म्हाडाचेही विशेष आभार मानले. त्यामुळे  लॉटरीच्या वेळेस प्रमिलाचेही खूप कौतुक झाले.

प्रमिला दादरमधील मूकबधिर मुलांच्या शाळेत शिकली. तिने तिथे दहावीपर्यंतचे शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण केले. त्यानंतर तिने एसएनडीटी महाविद्यालयातून चित्रकला विषयात पदवी मिळवली. प्रमिला जन्मापासून मूकबधिर असली तरी तिने आणि तिच्या आई-वडिलांनी परिस्थितीसमोर कधी हार मानली नाही. 

प्रमिलाने महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढे अ‍ॅनिमेशन या विषयावरील एक कोर्स पूर्ण केला आणि वांद्य्रातील दिव्यांगांसाठीच्या अली यावर जंग संस्थेत नोकरी मिळवली. आता प्रमिला आपल्यासारख्याच मुलांना या संस्थेत प्रशिक्षण देत आहे. प्रमिला आणि तिच्या वडिलांना वाटले की आता प्रमिलाचेही हक्काचे घर असावे. त्यामुळे तिने अंध-अपंग कोट्यातून अत्यल्प गटातील विरार-बोळींजमधील घरासाठी पहिल्यांदाच अर्ज केला आणि तिला नशिबाने साथ दिली आणि घर लागले.