Wed, Mar 20, 2019 03:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुलाब्यात डॉ. होमी भाभा ‘क्‍लस्टर’ विद्यापीठ

कुलाब्यात डॉ. होमी भाभा ‘क्‍लस्टर’ विद्यापीठ

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत कुलाबा येथे रुसा अंतर्गत प्रथमच एका क्‍लस्टर विद्यापीठाची स्थापना होणार आहे. यासाठी 55 कोटींचा निधी मंजूर झाला असून यामध्ये इन्स्टिटयूट ऑफ सायन्स सिडनहॅम, एल्फिन्स्टन, शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. 

रुसाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्र राज्याचा समूह विद्यापीठाचा सुधारित प्रस्ताव मान्य करण्यात आला. या समूह विद्यापीठामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे अग्रणी (लीड) महाविद्यालय असेल आणि इतर सहभागी महाविद्यालयांमध्ये सिडनहॅम महाविद्यालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा समावेश आहे. या समूह विद्यापीठाला डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून 55 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. विज्ञान आणि संशोधनासाठी योगदान दिलेल्या कुलाबा येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था या क्‍लस्टरचे मुख्य काम पाहणार आहे.

सिडनहॅम महाविद्यालयाचा हा प्रस्ताव गेल्या काही दिवसापासून निधीच्या अभावामुळे लांबला होता. 2015 मध्ये सामूहिक विद्यापीठाचा प्रस्ताव आम्ही दिला होता. त्याला आता सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याने रुसाने याला मंजूरी दिली असल्याची माहिती प्राचार्या संगीता पकाडे यांनी दिली. सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या जवळच असलेल्या शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची इमारत ही रोमनकालीन असल्याने ती प्रसिद्ध असून मुंबई शहरातील ती प्राचीन इमारत आहे. 

1835 मध्ये मुंबईतील नागरिकांनी मुंबईचे तत्कालिन गव्हर्नर माउंटस्टार्ट एल्फिन्स्टन यांना श्रद्धांजली म्हणून मुंबईकरांना इंग्रजी भाषा, कला आणि साहित्य शिकवण्यासाठी 2.29 लाख रुपये गोळा केले. इ.स. 1836 मध्ये आर्थर बेडफोर्ड ऑरलबर आणि हरकनेस या दोन प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली होती असा या महाविद्यालयाचा इतिहास आहे.

कर्मचारी कमतरता, शैक्षणिक पुनरुज्जीवन, निधीचा अभाव, दिशाहिन नेतृत्व आणि राजकीय अनास्था अशा अनेक कारणामुळे हे महाविद्यालय लोकांच्या विस्मृतीत गेले आहे.  मात्र समूह महाविद्यालयात समावेश मिळाल्याने या महाविद्यालयाची आता नव्याने ओळख होणार आहे. 

विज्ञान आणि संशोधनाला चालना देण्यासाठी 1920 मध्ये पहिली भारतीय विज्ञान संस्था म्हणून रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ची स्थापना करण्यात आली. आता ही संस्था इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नावाने ओळखली जाते. याच संस्थेची कुलाबा येथील इमारत  डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे मुख्यालय म्हणून ओळखली जाईल. 

या संस्थेमध्ये डॉ होमी भाभा, एम. जी. मेनन, व्ही. व्ही. नारळीकर आणि रसायन तंत्रज्ञान विषयाचे प्रा. आर. डी. देसाई यांसारख्या नामवंत शास्त्रज्ञांनी शिक्षण घेतले. आता या संस्थेला या समूह विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले दिवस येणार आहेत.यंदाच्या रुसाच्या पहिल्या टप्यात अंतर्गत महाराष्ट्र राज्याचा समूह विद्यापीठाचा सुधारित प्रस्ताव मान्य करण्यात आल्याने या समूह विद्यापीठाला चालना मिळाली आहे.