Sun, Apr 21, 2019 14:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाबासाहेबांप्रमाणे भरपूर वाचन करा, सुशिक्षित व्हा : राज ठाकरे

बाबासाहेबांप्रमाणे भरपूर वाचन करा, सुशिक्षित व्हा : राज ठाकरे

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे पुस्तके वाचली, त्याप्रमाणे तुम्ही विद्यार्थ्यांनी भरपूर पुस्तके वाचा, अभ्यास करा, सुशिक्षित व्हा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. मालाडच्या कुरार व्हिलेजमधील आप्पापाडा येथे मनसेने सुरू केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि अभ्यासिकेचे ठाकरे यांच्या हस्ते रविवारी दुपारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे ग्रंथालय म्हणजे मनसेचा एक स्तुत्य उपक्रम आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले. या ग्रंथालयात यूपीएससी, एमपीएससी आदी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी हजारो पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

आप्पापाडा हा गरीब, कष्टकरी मराठी माणसांचा परिसर आहे. मी स्वत: आप्पापाडातच लहानाचा मोठा झाल्यामुळे या परिसरातल्या गरीब मुला-मुलींना शिक्षण घेताना, करिअर घडवताना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो त्याची मला पूर्ण कल्पना आहे. इथल्या मुलांना केंद्र तसेच राज्य सरकारतर्फे घेतल्या जाणा-या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी हे सुसज्ज ग्रंथालय उभारले आहे असे मनसेचे भास्कर परब यांनी यावेळी सांगितले. या  वातानुकूलित ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही बनविण्यात आली आहे. या अभ्यासिकेत विद्यार्थी अभ्यास करु शकतील. मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती-चरित्रे-ऐतिहासिक पुस्तकं, विविध कायद्यांची माहिती देणारे ग्रंथ, यूपीएससी-एमपीएससी-रेल्वेभरती आदी स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी विविध विषयांवरील संदर्भ पुस्तकं, अशा हजारो पुस्तकांनी हे ग्रंथालय सज्ज आहे, असे परब यांनी सांगितले.