होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. आंबेडकरांचा भूखंड बळकावला

डॉ. आंबेडकरांचा भूखंड बळकावला

Published On: Dec 29 2017 1:58AM | Last Updated: Dec 29 2017 1:55AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदारांच्या भूखंडावर एकाने बळाचा वापर करून कब्जा केल्याचे उघडकीस आल्यानंतर गुरूवारी आंबेडकरी चळवळीत एकच खळबळ उडाली आहे.  डॉ. आंबेडकर यांच्या नातवाने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. सुरेंद्र पाटील असे कब्जा करणार्‍याचे नाव फिर्यादीत नमूद करण्यात आले असून ते चोळेगाव-ठाकुर्ली परिसरात राहणारे आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा यशवंत आंबेडकर यांची डोंबिवली जवळच्या कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या गोळवली गावठाण हद्दीत सर्व्हे क्र. 69, भूमापन क्र. 8, प्लॉट क्र. 13 (अ), 11 व 5 अशी मालकी हक्काची जमीन आहे. त्यांच्या मृत्यूनंतर या जमिनीची महसूल दप्तरी भीमराव आंबेडकर (55) आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकी हक्काची नोंद आहे. आंबेडकर कुटुंबीय दादरच्या गोकुळदास रोडवर आंबेडकर भवनात राहतात. मात्र, गोळवलीतल्या या भूखंडावर तीन मजली इमारत उभारण्यात आली. ही इमारत उभारण्यासाठी चोळेगाव-ठाकुर्ली येथील नूतन कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक सुरेंद्र पाटील यांनी दादागिरी व बळाचा वापर करून आम्हा कुटुंबीयांना हुसकावून लावल्याचा आरोप डॉ. बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी बुधवारी 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी नोंदविलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी कलम 402, 447, 465, 567, 471 सह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कायद्याच्या 1989 चे कलम 3 (1), (5) अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले आदी अधिकार्‍यांनी कब्जा केलेल्या वादग्रस्त जागेची पाहणी केली.