Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम प्रजासत्ताकदिनी सुरू करण्याच्या हालचाली

डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम प्रजासत्ताकदिनी सुरू करण्याच्या हालचाली

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:23AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरक बांधण्यात येणार आहे. बांधण्यात येणार्‍या या स्मारकाचे काम प्रजासत्ताकदिनी सुरू करण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) सुरू आहेत. 

इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक कीर्तीचे स्मारक बांधण्यासाठी एमएमआरडीने दोनवेळा निविदा मागवल्या होत्या. दोनवेळा निविदा मागवूनही शापूरजी पालनजी कंपनी वगळता कोणत्याच कंपनीने निविदा भरली नाही. अखेर एमएमआरडीए प्राधिकरणाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत स्मारकाच्या बांधकामासाठी शापूरजी पालनजी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. 

कंपनीची निवड न झाल्याने स्मारकाचे बांधकाम 6 डिसेंबर रोजी सुरू करता आले नाही. परंतु आता 26 जानेवारी या प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त साधून स्मारकाचे बांधकाम सुरू करण्याचे प्रयत्न एमएमआरडीएने सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी वेळ दिल्यास 26 जानेवारी रोजी बांधकामाला सुरुवात होईल, असे एमएमआरडीएद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.