Mon, Apr 22, 2019 12:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २०२२ मध्ये डबलडेकर बसचा प्रवास थांबणार

२०२२ मध्ये डबलडेकर बसचा प्रवास थांबणार

Published On: Dec 25 2017 1:42AM | Last Updated: Dec 25 2017 1:20AM

बुकमार्क करा


मुंबई : राजेश सावंत

मुंबईकरांचीच नाही तर, देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करणार्‍या बेस्टच्या डबलडेकरचा प्रवास 2022 मध्ये थांबणार आहे. बेस्टची आर्थिक परिस्थिती दोलायमान असल्यामुळे डबलडेकर बस खरेदी न करण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन पोहोचले आहे. त्यामुळे गेली 55 वर्ष मुंबईत दिमाखात फिरणार्‍या डबलडेकर बस येणार्‍या काळात म्युझियममधील एकाद्या फोटोमध्ये पर्यटकांना पाहायला मिळतील.

मुंबईत 16 जुलै 1926 मध्ये पहिली बस सुरू झाली. विजेच्या ट्रॅमप्रमाणेच बसचेही मुंबईकरांनी जोरदार स्वागत केले. सुरुवातील बससेवेला मुंबईतील टॅक्सीवाल्यांनी विरोध केला. बसचे भाडे सामान्य जनतेला परवडणारे नव्हते. त्यामुळे अधिकारीवर्ग बसचा वापर करू लागले. पण कालांतराने सामान्य मुंबईकरही बसचा वापर करू लागला. 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्टची मालकी मुंबई महापालिकेकडे आल्यानंतर बेस्टच्या ताफ्यात 242 बस होत्या. त्यानंतर बेस्टची आगेकूच सुरू राहिली. प्रवाशांची संख्या वाढू लागल्यामुळे बसला गर्दी होऊ लागली. त्यामुळे बेस्टने दुमजली बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला. एकमजली बसपेक्षा दुमजली बसची दीडपट जास्त प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती. त्यात बसला एका ड्रायव्हरच्या सहाय्याने ही बस चालवता येते. एवढेच नाही तर, एकमजली बस इतका रस्ता व्यापत असल्यामुळे बेस्टने 1961 मध्ये पहिली दुमजली बस ताफ्यात दाखल केली. त्यामुळे डबलडेकर बस मुंबईकरांसाठीच नाही देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण ठरली.    
डबलडेकर बस आता बेस्टला आर्थिकदृष्ट्या परवडणार्‍या नसल्यामुळे गेल्या 7 ते 8 वर्षात एकही डबलडेकर बस खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर बसची संख्या आता अवघी 122 राहिली आहे. यातील काही बस 2021 मध्ये तर उर्वरित बस 2022 मध्ये मोडीत निघणार आहेत. त्यामुळे 2022 नंतर मुंबईतील डबलडेकरचा प्रवास नाईलाजाने थांबवावा लागणार असल्याचे परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. बेस्टच्या तिजोरीत कर्मचार्‍यांना वेळेत पगार द्यायला पुरेसा निधी नाही. त्यामुळे कर्ज काढून सध्या कर्मचार्‍यांचा पगार देण्यात येत आहे. अशा कमकूवत आर्थिक परिस्थितीत बेस्टने भाड्याने बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणार्‍या दहा वर्षात डबलडेकर बस खरेदी करणे शक्य नसल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.