Fri, Nov 24, 2017 20:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सैफी बुरहानीने विकत घेतल्या डॉन दाऊदच्या तिन्ही मालमत्ता

सैफी बुरहानीने विकत घेतल्या डॉन दाऊदच्या तिन्ही मालमत्ता

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जप्त केलेल्या मुंबईतील तिन्ही संपत्तींचा लिलाव मंगळवारी चर्चगेटच्या आयएमसी इमारतीमधील किलाचंद कॉन्फरन्स रूममध्ये पार पडला. विशेष म्हणजे, भेंडीबाझार, नागपाडा परिसरातील इमारतींचा पुनर्विकास करत असलेल्या सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने दाऊदच्या तिन्ही संपत्ती तब्बल 11 कोटी 58 लाख रुपयांना खरेदी केल्या आहेत.

पाकमोडिया स्ट्रीटवर असलेल्या संपत्तींमध्ये रौनक अफरोज हॉटेल (दिल्ली झायका), डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊसचा समावेश होता. या लिलावामध्ये 12 जणांनी सहभागी होण्यासाठी अर्ज केले होते. सकाळी 10 वाजल्यापासून ही लिलाव प्रक्रिया सुरू झाली. प्रत्यक्ष लिलावात सहभागी, बंद लिफाफ्यातून सहभाग आणि आनलाईन प्रक्रियेद्वारे सहभाग अशा तीन पद्धतीने खरेदीदारांनी यात सहभाग घेतला.

डांबरवाला इमातीतील खोल्या 3 कोटी 54 लाख रुपये, रौनक अफरोज हॉटेल 4 कोटी 52 लाख 53 हजार रुपये आणि शबनम गेस्ट हाऊससाठी 3 कोटी 52 लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावत सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने खरेदी केले. या तिन्ही इमारती मोडकळीस आल्या असून त्यांचा लवकरच पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्या प्रवक्त्याने यावेळी बोलताना सांगितले.

दिल्लीतील वकील उपेंद्र भारद्वाज यांनी या लिलावात भाग घेत, रौनक अफरोज हॉटेलसाठी बंद लिफाफ्यातून 2 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र एका ट्रस्टने सर्वाधिक 4 कोटी 52 लाख रुपयांची बोली लावत हे हॉटेल खरेदी केल्याचे अ‍ॅड. भारद्वाज यांनी यावेळी बोलताना सांगितले.