Mon, Nov 12, 2018 23:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत भाजप,मनसे नगरसेवकांवर अपहरणाचा गुन्हा

डोंबिवलीत भाजप,मनसे नगरसेवकांवर अपहरणाचा गुन्हा

Published On: Mar 01 2018 1:52AM | Last Updated: Mar 01 2018 1:37AM
कल्याण : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ई-प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी अनधिकृत ढाब्यावर कारवाई केल्याने भाजप नगरसेवक शैलेश धात्रक व मनसे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी वाहन अडवून अपहरण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप भांगरे यांनी केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही नगरसेवकांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएनटी कॉलनी येथील अनधिकृत टीके ढाब्याची तक्रार आल्यावर प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी मंगळवारी दुपारी या ढाब्यावर कारवाई केली. कारवाई झाल्यानंतर आपण ई प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या दिशेने वाहन घेऊन जात होतो. त्यावेळी पाठीमागून नगरसेवक शैलेश धात्रक आणि  मंदार हळबे हे आपला पाठलाग करीत असल्याचे दिसले. तेव्हा मी माझी गाडी एमआयडीसी मार्गावर उभी केली. त्यावेळी नगरसेवक धात्रक यांनी आपल्या वाहनासमोर गाडी आडवी लावली आणि आपणास जातीयवाचक शिवीगाळ केल्याचे भांगरे यांनी सांगितले. 

यानंतर पुढे गेल्यावर मनसे नगरसेवक हळबे हे आपल्या वाहनाला आडवे आले. या दोघांनी आपल्यास जाब विचारला. ढाब्यावर कारवाई केल्याने दोघांनी आपली कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आपण एकटे असल्याने त्यांच्या तावडीतून तेथून सुटून घडलेला सर्व प्रकरण वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यानुसार नगरसेवक धात्रक आणि हळबे यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली. यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत मनसेचे नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांना संपर्क साधला असता, आपल्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. एमआयडीसी रोडने आपण जात असताना अधिकारी आणि नगरसेवक धात्रक दिसल्याने आपण थांबलो. तेथे त्यांचे काय चालले होते, मला ठाऊक नाही. मी अनधिकृत बांधकामांवर आवाज उठवतो आणि प्रशासनाला अडचणीत आणतो. म्हणून आपल्याला यात अडकवले जात असून, याला कायदेशीर उत्तर देऊ असे त्यांनी सांगितले.