Sun, Nov 18, 2018 07:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण परिसरात चड्डी-बनियन गँग सक्रीय

कल्याण परिसरात चड्डी-बनियन गँग सक्रीय

Published On: Dec 05 2017 2:00AM | Last Updated: Dec 05 2017 2:00AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

रविवारी पहाटेच्या सुमारास चड्डी-बनियन गँगच्या 7-8 जणांनी कल्याण पश्‍चिमेकडील योगीधाम परिसरातील विधी कॉम्प्लेक्स व सिद्धी कॉम्प्लेक्समध्ये एन्ट्री केली. तेथील 3 घरे फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या या गँगने इमारतीतील वॉचमनला धमकावून लूटमार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे योगीधाम परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये चड्डी-बनियन गँगने शिरकाव करून धुमाकूळ मांडला होता. एका कॉम्प्लेक्समध्ये वॉचमनला झोडपून इमारतीमधील बंद घरे फोडल्याचे समोर आले होते. पोलीस या गँगच्या मागावर असतानाच रविवारी याच चड्डी-बनियन गँगने कल्याणमध्ये पुन्हा एन्ट्री केल्याचे समोर आले. पहाटे 3 च्या सुमारास चड्डी-बनियन घातलेले सात ते आठ जणांचे टोळके गौरीपाडा (योगीधाम) येथील विधी कॉम्प्लेक्समध्ये घुसले. त्यांनी इमारतीचा वॉचमन प्रवीण भारती याला दमदाटी करत तेथेच बसवून ठेवले. 

वॉचमनला जीवे मारण्याची धमकी देत इमारतीत प्रवेश करून दोन घरांची कुलुपे तोडून चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच परिसरातील वास्तू सिद्धी कॉम्प्लेक्समधील एका घराचे लॉक तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व प्रयत्न असफल ठरल्यानंतर या गँगने तेथून काढता पाय घेतला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात फरार टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान चड्डी-बनियन गँग अवतरल्याची वार्ता शहरात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या गँगचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.