होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीच्या व्यावसायिक बंधूंचे क्वालालंपूरमध्ये अपहरण

डोंबिवलीच्या व्यावसायिक बंधूंचे क्वालालंपूरमध्ये अपहरण

Published On: Aug 07 2018 1:41AM | Last Updated: Aug 07 2018 1:13AMडोंबिवली : वार्ताहर

उद्योग-व्यवसायासाठी मलेशियात असलेल्या डोंबिवलीतील दोघा सख्ख्या भावांचे तेथील खंडणीखोरांनी अपहरण केल्याचे समोर आले आहे. ‘तुझी मुले आमच्या ताब्यात आहेत. बर्‍या बोलाने एक खोका दे, नाहीतर तुझ्या मुलांचे तोंडही पाहू शकणार नाहीस,’ अशी धमकीच क्वालालांपूरच्या खंडणीखोरांकडून आल्याने डोंबिवलीतील वैद्य कुटुंबियांमध्ये एकच घबराट पसरली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे तातडीने वर्ग केले आहे.

डोंबिवली-पूर्व कल्याण रोडवरील सेंट्रल रेल्वे को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत राहणार्‍या वैद्य कुटुंबातील रोहन (36) आणि कौस्तुभ प्रकाश वैद्य (31) हे दोघे सख्खे भाऊ उद्योग-व्यवसायासाठी मलेशियात आहेत. मात्र, मलेशियातील क्वालालांपूर येथून गुरुवारी, 2 ऑगस्टला रात्री या दोघांचे अपहरण झाले. कर्त्या मुलांचे अपहरण झाल्याने वैद्य कुटुंबीयांवर संकटाचा डोंगर कोसळला असून अपहरणर्त्यांनी  वैद्य कुटुंबियांकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीचीही मागणी केली आहे. या संदर्भात डोंबिवली पोलीस ठाण्यात, तसेच ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे अपहृत तरुणांचे काका राजीव वैद्य यांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र या संदर्भात पोलिसांना विचारले असता तपास सुरू असल्याचे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार देण्यात दिला आहे.

उपलब्ध माहितीनुसार कौस्तुभ व रोहन हे ‘रॉक फ्रोझन फुड’ या कंपनीच्या माध्यमातून ‘फ्रोझन फिश’ची मलेशिया, थायलंड, व्हिएतनाममध्ये विक्री करतात. या संदर्भात राजीव वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात पोलिसांनी बोलण्यास बंदी केली असल्याचे सांगून कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. 

पोलीस तपास करत असल्याने आताच काही सांगता येणार नाही असेही त्यांनी सांगितले. तर डोंबिवलीतील वैद्य बंधूंच्या निवासस्थानी भेट दिली असता तेथे काही महिला नातेवाईक होते. त्यांना विचारले असता राजीव वैद्य घरात नाहीत व आम्ही कोणीही बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे सांगून कृपया काही विचारू नका, अशी त्यांनी विनंती केली. या गंभीर घटनेची चर्चा शहरात सुरू असून वैद्य बंधूच्या सुटकेकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.

अपहरणकर्त्यांच्या ताब्यात असलेल्या रोहन याने 3 ऑगस्ट रोजी रात्री 10.26 ते 11.02 दरम्यान आपल्या वडिलांना 11 फोन केले होते. इतर भाषा समजत नसल्याने अपहरणकर्त्यांच्या तावडीत सापडलेले दोघे भाऊ आपल्या वडिलांशी फोनवर बोलताना इंग्रजीत बोलतात. मात्र, बाप-लेकांमध्ये काय बोलणे झाले किंवा रोहन काय बोलला? हे कोणालाच माहीत नाही. त्यातच रविवारी कौस्तुभ याच्या खात्यातून अपहरणकर्त्यांनी 25 हजार रूपये काढल्याचे समजते. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडील एका व्यक्तीचा नंबर दिला आहे. ती व्यक्ती सांगेल त्या खात्यात पैसे भरावे लागत असल्याची माहिती सूत्रांकडून  समजली. सदर भावांचा वर्षाला 10 लाखांचा टर्नओव्हर आहे. ज्या नंबरवरून फोन आला आहे तो आता लागत नाही. मात्र आम्ही सुखरूप असून लवकरच येतोय, असेही वैद्य बंधूंनी घरच्यांना सांगितले आहे. मात्र ते जेव्हा भारतात परततील तेव्हाच खरे काय ते समोर येणार आहे.

वैद्य कुटुंबीयांवर संकटाचा डोंगर कोसळला असून दोन्ही मुले सुखरूप कधी येणार या चिंतेने सर्वांना ग्रासल्याचे दिसून आले. मुलांच्या काकू नेहा वैद्य अत्यंत चिंतेत दिसल्या. बोलण्याच्या मन:स्थितीत नसतानाही त्या समोर आल्या व कृपया काही विचारू नका. आम्ही वेगळ्याच मन:स्थितीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार स्वत: कौस्तुभ व रोहन यांनी घाबरलेल्या अवस्थेत वडिलांना फोनवर संपर्क साधला. आमचे अपहरण झाले असून अपहरणकर्ते एक कोटी रुपयांची खंडणी मागत असल्याचे सांगितले.