होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीच्या फेरीवाल्यांचा दहीकाला तुरुंगात

डोंबिवलीच्या फेरीवाल्यांचा दहीकाला तुरुंगात

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 1:05AMडोंबिवली : वार्ताहर

डोंबिवलीच्या स्टेशन परिसरातून हटविल्यानंतर रहदारीच्या फडके रोडच्या दुतर्फा आपले बस्तान मांडणार्‍या फेरीवाल्यांना बेकायदा जमाव जमवून कायदा हातात घेण्याचे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. अटक सत्र आणि पोलीस कोठडीच्या कारवाईनंतर 20 फेरीवाले तथा आरोपींना कल्याण कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील 5 महिलांची भायखळ्याच्या आर्थर रोड तुरुंगात, तर उर्वरित 15 पुरुष आरोपींची रवानगी तळोजा येथील तुरुंगात करण्यात आली आहे. या सर्वांच्या जामीन अर्जावर सोमवारपासून सुनावणी घेण्यात येणार असल्याने सोमवारचा दहीकाला फेरीवाल्यांना तुरुंगातच करावा लागणार आहे. 

नूतन रणदिवे, रेश्मा कुरेशी, आस्मा ठक्कर, आशा मगरे आणि लक्ष्मी थेटे अशी आर्थर रोड तुरुंगात धाडण्यात आलेल्या 5 जणींची नावे आहेत. तर बाबू नायडू, सद्रृद्दीन शेख, नईम खान, अष्टपाल कांबळे, सिकंदर खान, हबीब शेख, संदीप जयस्वाल, जितू मल्लाह, शितलाप्रसाद यादव, बबन कांबळे, दीपक भालेराव, भालचंद्र पाटील, अनंता पाटील, कांचन सिंग आणि संजय सिंग अशी तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलेल्या 15 जणांची नावे आहेत.

आधारवाडी तुरूंगाची कैदी ठेवण्याची क्षमता 540 इतकी असूनही आजमितीला जवळपास 1400 कैदी असून त्यात 114 महिला कैदी आहेत. या महिला कैद्यांची 23 मुले देखील त्यांच्यासोबत आहेत. 540 क्षमतेच्या कारागृहात जवळपास 1600 कच्चे/पक्के कैदी दाटीवाटीने कोंबण्यात आले आहेत. या कैद्यांना झोपण्यासाठीही जागा नसल्यामुळे कारागृह प्रशासनावर भार पडण्यासह कैद्यांमधील वाद देखील होत असतात. त्यामुळे नव्याने कोणताही कैद्याची खोगीरभर्ती नको म्हणून डोंबिवली फेरीवाला दंगा प्रकरणातील 20 आरोपींना तुरूंग प्रशासनाने नाकारले. परिणामी या 20 आरोपींची मुंबईच्या आर्थर रोड आणि नवी मुंबईच्या तळोजा तुरुंगात रवानगी करण्यात आली.

डोंबिवली स्टेशन परिसरात 150 मीटर अंतराच्या आत बसणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाईची होत आहे. अशीच कारवाई बुधवारी, 29 ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आली. केडीएमसीच्या फेरीवाला हटाव पथकाने स्टेशन परिसरातून हुसकावून लावलेल्या फेरीवाल्यांनी थेट फडके रोडवर जाऊन बस्तान मांडले. त्याला स्थानिक व्यापार्‍यांनी विरोध केला असता या फेरीवाल्यांनी व्यापार्‍यांशी शिवीगाळ आणि दादागिरी सुरू केली. ही माहिती मिळताच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिका आणि पोलिसांच्या मदतीने त्या फेरीवाल्यांना तेथून हुसकावून लावले. मात्र यावेळी फेरीवाल्यांनी केडीएमसीच्या फेरीवाला पथकाला देखील शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. यावेळी महापालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाच्या गाडीचे काच फोडून नुकसान केले होते.