Sun, Mar 24, 2019 08:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांची अखेर बदली

केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांची अखेर बदली

Published On: Mar 16 2018 3:25PM | Last Updated: Mar 16 2018 3:25PMडोंबिवली : वार्ताहर

गेल्या आठवडाभरापासून कल्याणमधील नागरिक आधारवाडी डंम्पिंगमुळे हैराण असल्याने अधिवेशनात हा मुद्दा गाजला. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांची बदली केली. वेलरासू यांच्याजागी जी. एम. तथा गोविंद बोडके यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. 

गुरुवारी मध्यरात्री उशिरापर्यंत वेलरासू सत्ताधाऱ्यांसमवेत महापालिकेच्या बजेट संदर्भात कामात व्यस्त होते. तथापी शुक्रवारी सकाळी आयुक्त पी. वेलरासू यांची तडकाफडकी बदली झाल्याचे वृत्त कल्याण-डोंबिवलीत येऊन धडकले. पी. वेलरासू हे वर्षभरापूर्वी या महापालिकेत आयुक्त म्हणुन रुजु झाले होते. केडीएमसीच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासूनच येथे त्यांचे मन रमत नाही अशी खोचक टीका सत्ताधारी शिवसेनेसह भाजपानेही केली होती. म्हणूनच गेले वर्षभर या महापालिकेत कोणतीही विशेष विकासकामे झाली नाहीत. उलट डोंबीवली हे घाणेरडे शहर असा कलंक लावला गेल्याने सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यातच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही घाणेरडे शहर म्हणून डोंबिवलीचा उल्लेख केला होता. त्यापाठोपाठ आधारवाडी डम्पिंगला लागलेली आग या सर्व घटनाक्रमांमुळे वेलरासू यांची बदली करावी, अशी मागणी कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी अधिवेशनात केली होती. अखेर शुक्रवारी सकाळीच पी. वेलरासू यांची बदलीच्या आदेशाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी काढलेल्या आदेशाद्वारे वेलरासू यांची बदली करण्यात आली आहे. 

पी. वेलरासू आता राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकी संचालक म्हणून कारभार सांभाळणार असल्याचे त्या आदेशात नमूद केले आहे. तातडीने  नवा पदभार स्विकारावा असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.