Wed, Mar 27, 2019 04:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत गतिमंद मुलांची हंडी ठरली लक्षवेधी 

डोंबिवलीत गतिमंद मुलांची हंडी ठरली लक्षवेधी 

Published On: Sep 03 2018 7:11PM | Last Updated: Sep 03 2018 7:11PMडोंबिवली : वार्ताहर

ढाकुमाकुमच्या तालावर कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळपासूनच गोविंदा पथकांच्या सलामीचा थरार पहावयास मिळत होता. मुंबई ते कर्जत-कसाऱ्या पर्यंतची लहान-मोठी गोविंदा पथके कल्याण-डोंबिवलीत दहीहंडी फोडण्यास दाखल झाली होती. ठिकठिकाणी खासगी २६३, तर ५२ ठिकाणी सार्वजनिक अशा एकूण ३१५ दहीहंड्या विविध गोविंदा पथकांकडून फोडण्यात आल्या.

सोमवारी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव झाल्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून दहीहंड्यांच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. भाजप पुरस्कृत आणि डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने बाजीप्रभू चौकात उभारलेली बचत योजनेचे महत्व सांगणारी हंडी, तसेच पश्चिम डोंबिवलीच्या मथुरा मनाची गतिमंद मुलांसाठी मथुरा मनाची हंडी उत्सवाचे आकर्षक ठरली होती

पश्चिमेकडील शिवसेना कोपर गाव शाखा, लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था आणि शिवमंदिर मित्र मंडळाच्यावतीने ५५ हजार ५५५ रूपये रोख पारितोषक असलेल्या दहीहंडीला परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनि राजेंद्र मुणगेकर, रितेश पावशे, रोहन पाटील, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी किरण मोंडकर, विवेक खामकर आदी मान्यवर उपस्थित होते. दीनदयाळ रोडवरील चिंतामण सोसायटी येथे भाजप आणि ओम गणपती मित्र मंडळाच्यावतीने नगरसेवक शैलेश आणि नगरसेविका मनीषा धात्रक या दाम्पत्याच्यावतीने दहीहंडीच्या सलामीला गोविंदा पथकांची रीघ लागली होती. दरवर्षी प्रमाणे यंदाही याठिकाणी महिलांसाठी विशेष दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरले होते. सलामीला देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला धात्रक दाम्पत्याकडून स्मृतीचिन्ह देण्यात आले. महात्मा फुले रोडवरील मथुरा मनाची दहीहंडी उत्सव 33 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने आयोजकांनी सांगितले. या ठिकाणी गोविंदा पथकांत मोठा उत्साह दिसत होता. यावेळी माजी नगरसेवक जितेंद्र भोईर आणि परिवहन समिती सदस्य शैलेश भोईर यांनी गतिमंद मुलांसाठी मथुरा मनाची हंडी लावून त्यांना या खेळात समाविष्ट केले. तर या परिसरात नवसाची हंड्याही लावण्यात आल्या होत्या. ओम शिव मित्र मंडळाने यावर्षी दहीहंडी न बांधता केरळ पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत केल्याचे माजी नगरसेवक रणजीत जोशी यांनी संगीतले. आजदे गावातील वै. ह. भ. प. बाळाराम कृष्णा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने  अध्यामिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 2 लाख 22 हजार 222 रुपये अशी पारितोषिके असलेल्या या दहीहंडीला विविध भागातून आलेल्या गोविंदा पथकांची सलामी देण्यासाठी सकाळपासूनच रीघ लागली होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वासुदेव पाटील, एकनाथ पाटील, बुधाजी पाटील, मदन भोईर, नगरसेविका प्रमिला पाटील, माजी सरपंच मुकेश पाटील, नगरसेवक जालिंदर पाटील यांच्या हस्ते गोविंदा पथकांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. आजदेपाडा येथील शिवसेना आजदे शाखेच्या जे. पी. ग्रुप मित्र मंडळाने उभारलेल्या दहीहंडीला सलामी देण्यासाठी आलेले कळवा येथील जय माँ दुर्गे मित्र मंडळाने लावलेले पाच फिरते थर हे मुख्य आकर्षण असल्याचे आयोजक तथा माजी सरपंच जयंता पाटील यांनी सांगितले. या हंडीसाठी 1 लाख 11 हजार रुपये असे पारितोषक ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मानपाडा रोड येथे दहीहंडी लावण्यात आली होती. यावेळी श्रीकृष्ण बनून आलेल्या बालगोपाळांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, माजी नगरसेवक राजन मराठे आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवमंदिर रोड येथे लावल्यात आलेल्या शिवमंदिर मानाची हंदहीडी उत्सवात नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे आणि नगरसेविका भारती मोरे उपस्थित होते. यावेळी पर्यावरण मुक्त डोंबिवली असा संदेश देणाऱ्या लकी-ड्रॉमध्ये सायकल ठेवण्यात आली होती.

अष्टविनायक महिला पथकाच्या प्रमुख तथा नगरसेविका सरोज भोईर म्हणाल्या, आमचे पथक दिवसभर अनेक दहीहंड्यांना सलामी देते. आज महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेली नाही. भारतीय जनता पार्टी आणि ओम गणपती मित्र मंडळ यांच्यावतीने डोंबिवली पश्चिमेकडील एव्हरेस्ट परिसरात भव्य दहीहंडी महोत्सवात महिलासाठी लावलेली 22 हजार 222 रुपयांची दहीहंडी अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव महिला गोविंदा पथकाने फोडली. यावेळी नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक उपस्थित होते.