Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आईचा अपमान केल्याच्या रागातून हत्या

आईचा अपमान केल्याच्या रागातून हत्या

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 12:57AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याणात एकाच दिवशी लागोपाठ तीन हत्या झाल्याच्या घटना ताज्याच असताना रविवारी रात्री डोंबिवलीत ट्युशन टीचर मनीषा खानोलकर यांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी हत्या करून पसार झालेल्या रोहित तावडे याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आईचा अपमान केल्याच्या रागातून ही हत्या केल्याची कबुली रोहित याने पोलिसांना दिली आहे. रोहितला सोमवारी कल्याण कोर्टात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली.  

डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगावातल्या ओम परशुराम अपार्टमेंटमध्ये फ्लॅट बी/103 येथे मनीषा खानोलकर ही महिला 17 ते 18 वर्षांपासून एकटीच राहत होती. शाळकरी मुलांच्या ट्युशन घेऊन त्या उदरनिर्वाह करत होत्या. रविवारी सायंकाळी 4 च्या सुमारास ट्युशनसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र त्यांनी दरवाजा उघडला नाही. विद्यार्थ्यांनी खिडकीतून पाहिले असता त्या स्वयंपाकघरात निपचित पडलेल्या दिसल्या. विद्यार्थ्यांनी ही बाब सोसायटीतील रहिवाशांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी मनीषा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या मृतदेहाशेजारी रक्ताळलेला कुकर पडला होता. 

याबाबत माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुख्मिणीबाई रुग्णालयात पाठवला. मनीषा यांची हत्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. मात्र कोणतेच धागेदोरे पोलिसांना मिळत नव्हते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनीषा यांचे एका महिलेबरोबर भांडण झाल्याची माहिती अँटी चेन थेप्ट स्कॉडला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या महिलेचा शोध घेत तिचा मुलगा रोहित तावडे याला ताब्यात घेतले.