Wed, Mar 27, 2019 04:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यापलीकडेही रिक्षांना मीटरसक्ती

ठाण्यापलीकडेही रिक्षांना मीटरसक्ती

Published On: Mar 24 2018 1:51AM | Last Updated: Mar 24 2018 1:33AMअंबरनाथ/डोंबिवली  : प्रतिनिधी

कल्याण-डोबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर या ठाण्याच्या पलिकडील शहरांतही रिक्षांना मीटरसक्‍ती करण्यात आली आहे. तशा सूचना कल्याण आरटीओनी रिक्षा संघटनांना दिल्या आहेत. यामुळे रिक्षाने नियमित प्रवास करणार्‍यांना दिलासा मिळणार आहे. या आदेशाचे रिक्षा संघटनांकडून किती पालन होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच अंबरनाथ आणि बदलापूर शहरांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. रेल्वे स्थानकापासून बर्‍याच अंतरावर गृहसंकुलेही तयार झाली आहेत. मात्र ग्राहकांना घरी पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने व मीटरप्रमाणे येथील रिक्षा चालत नसल्याने नागरिकांना जादा पैसे देण्याची वेळ येते.

याचा विचार करून ज्याठिकाणी शेअर रिक्षा जाणार नाही, त्याठिकाणी मीटरप्रमाणे प्रवाशांना सोडावे, असा लेखी आदेश कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी कल्याण, डोंबिवली अंबरनाथ आणि बदलापूर येथील रिक्षा युनियनला दिला आहे. सध्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये शेअर आणि थेट भाड्याच्या रिक्षा चालतात.

कल्याण आरटीओ अंतर्गत कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ आदी परिसर येतो. या परिसरात जवळपास 95 हजार रिक्षा चालवल्या जात आहेत. रिक्षात मीटर असला तरी तो शोभेपुरताच असतो. मात्र यामुळे रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याच्या तक्रारी अनेकदा करण्यात येतात. अंबरनाथ-बदलापूर शहरांमध्ये कोणतीही परिवहन सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना रिक्षा सेवेवर अवलंबून रहावे लागते. रिक्षाशिवाय इतर पर्याय उपलब्ध नसल्याने रिक्षाचालकांचेही चांगलेच फावले आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाताना प्रवाशांकडून जादा पैसेही उकळण्यात येतात. मात्र कोणताही पर्याय नसल्याने व रात्रीच्या वेळेस पायी कसे जायचे, असा विचार करून नागरिक जादा पैसेही देतात.
 

 

tags : Dombivli,news,Rickshaws,meter, force,in Dombivli