Mon, Jan 21, 2019 03:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत रेल्वे दलालांचा प्रवाशांवर हल्‍ला

डोंबिवलीत रेल्वे दलालांचा प्रवाशांवर हल्‍ला

Published On: Dec 19 2017 2:03AM | Last Updated: Dec 19 2017 1:06AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

सुशिक्षित व सुसंस्कृत नगरी म्हणून डोंबिवलीकर अभिमानाने मिरवतात. मात्र याच डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकावर गुंडांच्या टोळ्या धुडगूस घालताना दिसत असल्याचे चित्र रविवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेतून दिसून आले आहे. रेल्वे स्थानकावरील आरक्षण तिकीट रांगेत उभ्या असलेल्या प्रवासी महिला आणि पुरुष मंडळींवर दलालांच्या टोळक्याने हल्ला चढविला. रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास मारहाणीदरम्यान जखमी झालेल्यांनी हा प्रकार आरपीएफच्या जवानांसमक्ष घडला, मात्र मध्ये कुणीही पडला नसल्याचा आरोप केल्याने डोंबिवलीचे आरपीएफ गोत्यात आले आहे.

या घटनेची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. अखिलेश गुप्ता, मिथिलेश मिश्रा आणि महिंद्र मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी मात्र अटक आरोपी तिकीट दलाल नसल्याचा दावा करून तपास सुरू असल्याचे सांगितले. डोंबिवली रेल्वे स्थानकावर एकाच ठिकाणी आरक्षित तिकिटांसाठी खिडक्या आहेत. तिकिटासाठी सविता साहू, रन्नू साहू आणि रवीशंकर साहू हे रांगेत उभे होते. इतक्यात काही लोक आले व त्यांनी रांगेतील लोकांना मागे जाण्यासाठी धमकावले. 

परंतु या प्रवाशांनी मागे जाण्यास नकार दिला. त्यामुळे दलालांच्या टोळक्याने हाणामारी सुरू केली. हे सर्व घडले तेव्हा आरपीएफचे जवान तेथेच उपस्थित होते. आरपीएफ मदत करण्याऐवजी दलालांच्या टोळक्याला मदत केल्याचा आरोप जखमींनी केला. या जखमींवर पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचार करून नंतर घरी सोडण्यात आले. आरक्षण केंद्रावर लांबच लांब रांगा नेहमी असतात. मात्र दलालांना मदत करण्यात रेल्वे कर्मचार्‍यांचाही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. 

या संदर्भात रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरीशंकर हिरेमठ यांनी सांगितले की, पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाठविण्यात आले आणि आरोपींनाही अटक केली. मात्र हल्लेखोर तिकीट दलाल आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.