Sun, Mar 24, 2019 12:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीच्या गुजराती संकुलाचे नाव मराठीत

डोंबिवलीच्या गुजराती संकुलाचे नाव मराठीत

Published On: Mar 14 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 1:05AMडोंबिवली : वार्ताहर

डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाड्यात उभारण्यात आलेल्या नवनीतनगर या गृहसंकुलाच्या इमारतीवर गुजराती भाषेत लिहिलेले नाव अखेर मराठी भाषेत करण्यात आले आहे. फक्‍त गुजराती भाषेत असलेल्या नावामुळे होणार्‍या संभाव्य वादाचे सविस्तर वृत्त सर्वप्रथम दै. पुढारीने 6 मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची संबंधित गृहसंकुलाने दखल घेऊन हीच नावे आता मराठी भाषेत टाकली आहेत.

डोंबिवलीत मराठीसह इतर भाषिक सणसुद्धा साजरे केले जातात. मात्र दुकानावरील पाट्या असो किंवा इमारतींना दिलेली नावे मराठीमध्ये असतात. याला देसलेपाड्यातील नवनीतनगर ही सोसायटी अपवाद ठरली होती. या इमारतीला चक्क गुजराती भाषेमध्ये नाव दिल्याने सुशिक्षितांचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठीबहुल डोंबिवलीत मराठी-गुजराती वाद उभा ठाकण्याची चिन्हे होती. 

दै. पुढारीने 6 मार्चच्या अंकात ‘मराठी डोंबिवलीत फक्त गुजराती गृहसंकुल’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. इमारतीला फक्‍त गुजराती भाषेत नाव दिल्यामुळे मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर भाषिक वाद चिघळू नये आणि कायदा, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कच्छी-जैन-गुजराती समाज संस्थेने तातडीचा निर्णय घेतला. मंगळवारी दिवसभरात रंगार्‍यांकडून या इमारतीवर असलेली गुजराती भाषेतील नावे काढून त्याठिकाणी मराठी भाषेत नावे रंगवण्यात आली. परिणामी हा वाद  आता मिटल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.