Fri, Jul 19, 2019 18:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्‍टाफरूममध्ये कोब्राची हजेरी; शिक्षकांची भंबेरी 

स्‍टाफरूममध्ये कोब्राची हजेरी; शिक्षकांची भंबेरी 

Published On: May 25 2018 6:47PM | Last Updated: May 25 2018 6:47PMडोंबिवली : वार्ताहर

साप म्‍हंटले की बर्‍याच जणांची भंबेरी उडते. त्‍यात तो कोब्रा असेल तर मग बोलायचे कारणच नाही. या कोब्रा जातीच्या सापाने आज चक्‍क शाळेतील स्‍टाफरूममध्येचं आपली उपस्‍थिती लावल्‍यानं गुरूजींची एकच धावपळ उडाली. ही थरकाप उडविणारी घटना कल्याण पश्चीमेकडील शेतकरी माध्यमिक विद्यालयात घडली.

कल्याण पश्चीमेकडील उंबर्डे गावात शेतकरी माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेला सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. मात्र काही शिक्षक या शाळेच्या स्टाफ रुममध्ये बसून शाळेची सुट्टी संपल्यानंतरचे नियोजन करण्यात साठी रोजच्या प्रमाणे शाळेत आले होते.  सकाळी साडे दहाच्या सुमाराला स्टाफ रुमचा दरवाजा उघडून कर्मचाऱ्याने रूमची साफसफाई  केरून तो  निघून गेला. यानंतर सुट्‍टी नंतरच्या नियोजनासाठी रुममध्ये उपस्थित असलेले शिक्षक कामात व्यस्त होते. त्याच सुमाराला वाबडे नावाच्या शिक्षक कपाटातून पुस्तक काढण्यासाठी गेले असता. त्यांना  पुस्तकांच्या कपाटात वेटोळे घालून बसलेला कोब्रा जातीचा नाग दिसला. त्याला पाहताच त्यांचा थरकाप उडाला. त्यांनी तत्काळ कोब्रा नाग आपल्या स्टाफ रुममध्ये शिरल्याची माहिती इतर शिक्षकांना दिली. स्‍टाफरूममध्ये कोब्रा साप शिरल्‍याची माहिती मिळताचं सर्व शिक्षकांनी स्टाफ रुममधुन पळ काढला.

शाळेत कोब्रा शिरल्याची माहिती काही वेळातच शाळेलगत असलेल्या वस्तीमध्ये येवून धडकताच बच्चेकंपनीसह नागरिकांनी या  सापाला पाहण्यासाठी धाव घेतली. तोपर्यत शाळेतील शिक्षक वाबडे यांनी सर्पमित्राला मोबाईलवरून संपर्क साधून, नाग शिरल्याची माहिती दिली. यावर सर्पमित्र हितेश करनजावकर यांनी घटनास्थळी येवून या कोब्रा सापाला पुस्तकाच्या कपाटातून बाहेर काढण्याचा प्रयत्‍न केला. मात्र कोब्रा चपळ असल्याने पुस्तकाच्या कपाटातून त्‍याने बाहेर पळ काढला. त्यानंतर हा साप पुन्हा लोखंडी कपाटाच्या खाली लपून बसला. यानंतर सर्पमित्राने 10 ते 15 मिनिटांच्या अथक प्रयत्‍नाने  या कोब्राला शिताफीने पकडून कापडी पिशवीत बंद केले. या थरकाप उडविणार्‍या घटनेनंतर शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या सापाला वन अधिकाऱ्यांची परवानगी घेवून जंगलात सोडण्यात येणार असून, हा कोब्रा जातीचा साप साडेतीन फुटाचा इंडियन कोब्रा असल्याची माहिती सर्पमित्र  हितेश करनजावकर यांनी दिली.