Sun, May 26, 2019 20:38



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आसनव्यवस्थेतील बदल प्रवाशांच्या मुळावर

आसनव्यवस्थेतील बदल प्रवाशांच्या मुळावर

Published On: Feb 21 2018 1:47AM | Last Updated: Feb 21 2018 1:17AM



डोंबिवली : वार्ताहर

मध्य रेल्वे प्रशासनाने उपनगरीय लोकलमधील आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे त्याचा लांब पल्ल्यावरील कर्जत, आसनगाव, कसारा येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही आसनव्यवस्था बदलताना रेल्वे प्रशासनाने अशा लोकल गाड्या जवळच्या मार्गावर चालवल्या जातील, असे जाहीर केले होते. मात्र, या गाड्या सीएसएमटीपासून कल्याण-ठाणे-कुर्ला अशा न चालवता कर्जत-कसारा-आसनगाव अशा मार्गावर चालवल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना उभ्यानेच दोन-दोन तास प्रवास करावा लागत आहे. 

लोकलमधील वाढती गर्दी लक्षात घेता आणि डोंबिवलीच्या भावेश नकाते यांच्या अपघातील मृत्यूनंतर रेल्वे प्रशासनाने लोकलच्या आसनव्यवस्थेत बदल केले. यामुळे पूर्वी ज्या आसनांवर 32 प्रवासी बसून प्रवास करायचे, आता त्याच आसनांवर केवळ 14 प्रवासी बसून प्रवास करत आहेत. मुळे लांब पल्ल्याच्या उपनगरीय लोकलच्या प्रवाशांना ठाणे-कल्याण पुढील रेल्वे स्थानकापर्यंत उभे राहुन प्रवास करावा लागतोे. सीएसएमटीपासून आसनावर बसलेला प्रवासी लांबच्या प्रवाशाला जागा देत नसल्याचा अनुभव येत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

मध्य रेल्वे प्रशासनाने उपनगरीय लोकल गाड्यांमधील आसनव्यवस्था बदलण्याअगोदर दूरवरील रेल्वे प्रवाशांचा विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. सीएसएमटी-कुर्ला मार्गावर तसेच कुर्ला-ठाणे मार्गावर अशा लोकल सोडल्यास प्रवाशांची फारशी गैरसोय होणार नाही, पण कर्जत-कसारा पर्यंत आणि तेथून सीएसएमटीपर्यंत असा प्रवास करावा लागणार म्हणजे मरण यातनाच असल्याची प्रतिक्रिया कर्जत, कसार्‍याच्या प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.