होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 20 लाखांची खंडणी घेताना महिला अटकेत

20 लाखांची खंडणी घेताना महिला अटकेत

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 16 2018 1:34AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याणच्या एका सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला सतत ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तब्बल 20 लाखांची खंडणी उकळणार्‍या महिलेला ठाणे खंडणी पथकाने सापळा रचून अटक केली. सुषमा दाते (45) असे खंडणीखोर महिलेचे नाव असून, कल्याण पश्‍चिमेकडील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली.  बांधकाम व्यावसायिक मिलिंद कुलकर्णी यांचे कल्याण पश्‍चिमेत कार्यालय आहे. या कार्यालयात 14 वर्षापूर्वी सुषमा नोकरी करत असे. दरम्यान ऑगस्ट 2017 पासून सुषमा हिने ऑफिसच्या फोनवरून धमकी दिली. तुमची माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे. ही क्लिप तुमच्या कुटुंबाला दाखवून तुमची बदनामी करेन, अशी धमकी वारंवार कुलकर्णी यांना देत होती.

मात्र उगाच बदनामी नको म्हणून या ब्लॅकमेलरला कुलकर्णी यांनी दरम्यानच्या काळात 11 लाख रुपये दिले. तरीही ती कुलकर्णी यांना बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन 40 लाखांची मागणी करत होती.  माझ्या जीवाचे बरेवाईट करून तुमचे नाव घेईन. तसेच माझी बहीण पोलीस असल्याचीही ती धमकी देत,तसे एसएमएस पाठवत होती. अखेर या त्रासाला कंटाळून कुलकर्णी यांनी ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे धाव घेऊन तक्रार केली. 

सुषमाला 20 लाखांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले होते. हाच हप्ता घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी 4 च्या सुमाराला ठाणे खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक विलास खेडकर, फौजदार हेमंत ढोले, म. फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांच्यासह महिला पोलीस कर्मचार्‍यांनी कल्याण-मुरबाड रोडवरील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. हॉटेलमधून कुलकर्णी यांच्याकडून 20 लाख रुपये स्वीकारताना सुषमाला पोलिसांनी रंगेहात बेड्या ठोकल्या. सुषमाला शुुक्रवारी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी  सांगितले.