Wed, Nov 21, 2018 13:16



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उत्‍तर प्रदेशच्या तस्‍कराला देशी कट्‍टे,काडतुसांसह अटक 

उत्‍तर प्रदेशच्या तस्‍कराला देशी कट्‍टे,काडतुसांसह अटक 

Published On: Apr 15 2018 5:18PM | Last Updated: Apr 15 2018 7:10PM



डोंबिवली : वार्ताहर

डोंबिवलीच्या गजबजलेल्या नाक्यावर गुन्हेगारांना अग्निशस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या उत्तर भारतातील तस्कराच्या क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने तब्बल अर्धा तास कडवी झुंज देऊन पकडण्यात यश मिळविले आहे. या तस्कराने उत्तरप्रदेशातून आणलेले 2 जिवंत काडतुसांसह देशी बनावटीची दोन काडतुसे क्राईम ब्रँचने हस्तगत केली आहेत.

हबीब रशीद शेख (वय 27) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव असून, तो जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील इस्लामपूरा (श्रीराम पेठ) या गावचा राहणारा आहे. डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्टेशन आणि पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वृंदावन नाक्यावर शस्त्र साठ्यासह तस्कर येणार असल्याची माहिती कल्याण युनीटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि संतोष शेवाळे यांच्यासह राजेंद्र घोलप, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, सतीश पगारे, अरविंद पवार, हरिश्चंद्र बंगारा आणि विश्वास चव्हाण या पथकाने शनिवारी दुपारपासून नाक्यावर जाळे पसरले होते. जवळपास तासाभराच्या प्रतिक्षेनंतर एक तरूण या नाक्यावर आला. पोलिसांनी चहो बाजूंनी त्याला घेराव घातला. आपण पकडले जाणार असल्याची खात्री पटताच या तरूणाने तेथून धूम ठोकली. तब्बल अर्धा तास सुरू असलेल्या पाठशिवणीच्या खेळानंतर अखेल तो पोलिसांच्या हाती लागला. हा तस्कर इतका चपळ आहे की काही क्षणाच्या अवधीतच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पसार झाला असता. पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीत दरम्यान बॅगची झडती घेतली असता, चौकडी शर्टात गुंडाळून ठेवलेले काडतूसांनी लोड केलेले 2 देशी बनावटीचे कट्टे त्‍याच्याकडे आढळून आले. या शस्त्रास्त्रांची बाजारपेठेत 30 हजार 500 इतकी किंमत आहे. या प्रकरणी पोलिस नाईक राजेंद्र घोलप यांच्या फिर्यादीवरून डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने या तस्कराला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

तस्कराचा परराज्य टोळीशी संबंध असल्याचा कयास :

जळगाव जिल्ह्यात राहणारा असल्याचे सांगणारा हा तस्कर चोरी-छुपे मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळच्या झोपडपट्टीत राहत असल्याचे समोर आले आहे. सदर शस्त्रसाठा या तस्कराने उत्तरप्रदेशातून आणल्याचे त्याच्याकडे सापडलेल्या कट्टयांवरील मार्कवरून स्पष्ट होते. हा साठा कुणाकडून आणला आणि कुणाला विक्री करायचा होता. आणखी शस्त्रे आहेत का? गुन्हेगारी टोळीशी या तस्कराचा संबंध आहे का? या तस्कराचा परराज्य टोळीशी काही संबंध आहे का ? याचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रँचने कोर्टाला 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. तथापी कोर्टाने दिलेल्या 2 दिवसांच्या मुदतीत या तस्कराकडून अनेक गुन्ह्यांची उकल करण्याचे क्राईम ब्रँचला आव्हान आहे.