होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'विकासकामांचे श्रेय लाटण्याची शिवसेनेला सवय नाही'

'विकासकामांचे श्रेय लाटण्याची शिवसेनेला सवय नाही'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

शिवसेना कोणत्याही विकासकामाचे विनाकारण श्रेय घेत नाही. शिवसेनेला ती सवयही नाही. मात्र आम्ही जे काम करतो ते मात्र छातीठोकपणे सांगतो, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुभाष भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना केले. 

अंगणवाडी सेविकांचा मेस्मा रद्द, ठाण्याची क्लस्टर योजना, शेतकऱ्यांच्या सरकारने मान्य केलेल्या मागण्या अशी अनेक कामे शिवसेनेच्याच पाठपुराव्याने झाली असे सांगून शिंदे म्हणाले, विरोधक त्यांची भुमिका निभावण्यात कुचकामी ठरले त्यामुळे सरकारमध्ये राहून सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावर देखील उतरतो. कारण समाजकारण पहिले हिच शिकवण आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांनी दिली आहे.

शिवसैनिक हिच खरी ताकद आहे. त्यामुळे निवडाणुका तोंडावर असताना कार्यालये उघडायची ही शिवसेनेची पध्दत नाही. त्यामुळे प्रभागा प्रभागातील शिवसेनेच्या शाखा व लोकप्रतिनिधींची संपर्क कार्यालये नेहमी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळेच शिवसैनिकांच्या ताकदीवर शिवसेना केव्हाही निवडणुकांना सामोरे जाण्यास तयार असते. कल्याण ग्रामीण मतदार संघाचे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी रात्री डोंबिवली जवळील मानपाडा येथे करण्यात आले. या जनसंपर्क कार्यालयामुळे मतदारांच्या समस्या सोडविणे अधिक सोपे होईल असा विश्वास भोईर यांनी प्रास्ताविकात केला. याप्रसंगी खा. राजन विचारे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळराव लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महापौर राजेंद्र देवळेकर, शहरप्रमुख राजेश मोरे, युवासेनेचे सुमीत भोईर, एकनाथ पाटील, पूर्वेश सरनाईक, लता पाटील, कविता गावंड व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.            

जनसंपर्क वाढविण्यासाठी  मध्यवर्ती कार्यालयाची आवश्यकता असते परंतु इथे जमलेला जनसमुदाय बघून सुभार भोईर यांचा जनसंपर्क किती व्यापक आहे याची सहज कल्पना येते असे गौरवोद्गार अभिनेते अंकुश चोधरी यांनी व्यक्त केले. तेव्हा जेष्ठ निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


  •