Thu, Jul 18, 2019 20:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सी-गल पक्ष्यांनी साकारला भारताचा नकाशा

सी-गल पक्ष्यांनी साकारला भारताचा नकाशा

Published On: Jan 11 2018 3:52PM | Last Updated: Jan 11 2018 3:52PM

बुकमार्क करा
डोंबिवली :   बजरंग वाळुंज

कल्याणच्या खाडीवर आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या दर्शनासाठी भिवंडी-कल्याणकरांची गर्दी वाढत चालली आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या  'सी-गल' पक्ष्यांनी खाडीच्या पात्रावर गुरूवारी सकाळी चक्क भारताचा नकाशाच सादर केल्याचे दिसून आले.

अथांग पसरलेली खाडी आणि त्यावर मनसोक्त जलविहार करणारे पांढरे शुभ्र सी-गल पक्षी हे नयनरम्य वातावरण निर्माण करत आहेत. मनमोहक रूप असलेल्या या पक्ष्यांच्या प्रेमात भिवंडी-कल्याणकर पडले आहेत. कालपर्यंत या पक्षांवर प्रेम करणाऱ्यांनी त्यांना शेव-गाठी खाऊ घातल्या. या पक्ष्यांचे मुख्य भक्ष्य छोटे मासे आणि खेकडे असले तरी आता तर या पाहुण्यांना चिवडा, कुरकुरे, शेव-बुंदी आवडू लागली आहे. भिवंडी-कल्याणकरांच्या पाहुणचाराने हे सी-गल चांगलेच खवय्ये बनले आहेत. त्यामुळेच भिवंडी-कल्याणकरही त्यांना भेटायला येताना रिकाम्या हाताने कधीच जात नाहीत. नागरिक खाडीच्या पुलावर आल्याचे पाहताच हे पक्षीही न घाबरता अगदी उत्स्फुर्तपणे पुलाच्या काठावर येऊन मनसोक्त फोटोसेशन करवून घेत आहेत. गुरूवारी सकाळी तर या परदेशी पाहुण्यांनी कमालच केली. खाडीच्या पाण्यावर बसून भारताचा नकाशा सादर करून त्यांनी या देशावर जणू आमचे प्रेम असल्याचे दाखवुन दिले. हा नजारा टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईल कॅमेरे पुढे सरसावले होते. वर्षातून तीनवेळा हे परदेशी पाहुणे कल्याणच्या मुक्कामी येतात. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी आपणही एकदातरी नक्कीच जायला हवे, असे काही पक्षीप्रेमींनी सांगितले.